आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर नव्हे, दोन-तीन नेत्यांवरच नाराज; अद्याप पक्ष सोडण्याचा निर्णय नाही : एकनाथ खडसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगावातील कामे, गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी साकडे

मुंबई- शरद पवार यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. 'जळगावातील सिंचन प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी अापण काल पवारांची व अाज ठाकरेंची भेट घेतली. मी भाजप नव्हे, तर पक्षातील दोन-तीन नेत्यांवर नाराज अाहे. पक्ष सोडण्याचा किंवा शिवसेनेत जाण्याचा अद्याप तरी विचार नाही,' असे खडसेंनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.


'मी मंत्री असताना अाैरंगाबादेत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला मंजुरी दिली होती. मात्र मी पदावरून पायउतार झाल्यानंतर मागच्या सरकारकडून या स्मारकाच्या उभारणीबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे अाता नव्या सरकारने हे स्मारक मार्गी लावावे. १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणाही करावी, अशी मागणी अापण ठाकरे यांच्याकडे केली. त्यांनीही या स्मारकासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊ, असे अाश्वासन दिले,' अशी माहिती खडसेंनी पत्रकारांना दिली. संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तास-दीड तास चर्चा झाली होती.

'ते' मनधरणीसाठी अाले नव्हते
 
' मुनगंटीवार, तावडे मनधरणीसाठीच अाले असे नाही. अशा भेटीत राजकीय चर्चा होतच असते. नव्या सरकारबाबत तसेच अापले सरकार का अाले नाही, याची अामच्यात चर्चा झाली. - एकनाथ खडसे

खडसे आले तर आनंदच : थोरात
 
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, 'नाथाभाऊ हे आमचे आवडते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची अवहेलना होणे आम्हालाही आवडलेले नाही. नाथाभाऊंकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हीही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही. मात्र, अशी माणसं पक्षात अाली तर आनंद होईल, पक्षाला बळकटी मिळेल.'


शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले, भाजप व आमचे संबंध आज चांगले राहिले नाहीत हे खरे आहे. पण या दोन पक्षांनी पुन्हा एकत्र यावे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. आज आम्ही एक नाही, याचा अर्थ आम्ही पुन्हा कधीच एकत्र येणार नाही असं नाही. सेना-भाजप एकत्र येणे शक्य : जोशी

२०१४ मध्ये युती तोडण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी जाहीर केला होता, तेव्हापासून शिवसेनेचा खडसेंवर राग.जळगावचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील व खडसेंमध्ये राजकीय वैर.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांकडून खडसेंच्या कन्या रोहिणींचा पराभव. अाता भाजपत नाराज खडसेंनी शिवसेनेशी जवळीक वाढवली. 'एखाद-दोन वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले असते तर भाजपची सत्ता गेली नसती,' असे टोला त्यांनी स्वपक्षीयांना लगावला होता. अाता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी शिवसेनेशी यापुढे सलोखा वाढवण्याचे संकेत दिले.

ठाकरे भेटीत गैर काय : महाजन
 
खडसेंआधी भाजप नेते गिरीश महाजनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. 'ते मुख्यमंत्री अाहेत, अशा भेटी होतच राहणार,' असे महाजन म्हणाले. खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. ते कोणावर नाराज आहेत माहीत नाही. ते ठाकरेंने भेटले यात गैर काहीही नाही.'


खातेवाटप ठरलं : काँग्रेस अधांतरीच
गृह, नगरविकास सेनेकडे;
अर्थ, सहकार राष्ट्रवादीलाशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. परंतु शपथविधी झाल्यानंतर १३ दिवसांनंतरही एकमत झालेले नसल्याने या सरकारमधील खातेवाटप लांबणीवर पडले होते. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अाघाडीच्या मंगळवारच्या बैठकीत खातेवाटपावर एकमत झाल्याची माहिती अाहे. दोन-तीन दिवसांत खातेवाटप होईल तर हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता अाहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीला अर्थ, गृह, सहकार अशी खाती हवी होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृह आणि नगरविकास सोडण्यास तयार न झाल्याने खातेवाटपास विलंब होत होता. यावरून चोहोबाजूने टीका होऊ लागल्याने आणि पुढील आठवड्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असल्याने काही खात्यांचे वाटप करण्यास अाघाडीच्या नेत्यांनी संमती दर्शवली अाहे. त्यानुसार गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती शिवसेनेकडे राहतील. अर्थ, सहकार आणि गृहनिर्माण ही तीन खाती राष्ट्रवादीला देण्यास शिवसेना राजी झाली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर मात्र अजूनही सहमती झालेली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

१३ दिवसांपासून मंत्री बिनखात्याचे
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे मंत्री १३ दिवसांपासून सरकारमध्ये बिनखात्याचा कारभार पाहत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...