आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडाेबातल्या ‘वाघिणी’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ पाठक   

येणाऱ्या प्रत्येक संकटाचा धाडसाने सामना करत आज चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबाच्या अभयारण्यामध्ये माेहर्ली गावातील सहा महिला गाइडचे काम करत आहेत. ताडाेबाच्या ८०० एकरांवरच्या दाट जंगलाच्या किर्र झाडीत लपून बसलेल्या हिंस्र वाघाचे दर्शन आलेल्या प्रत्येक पर्यटकाला घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असताे. 


आहे त्या परिस्थितीत आणि खडतर आव्हानाचा सामना करत वाघ वा वाघीण हा प्राणी माेठ्या धाडसाने पाेटात पेटलेली भुकेची आग शांत करत असताे. यासाठी त्याला अनेकदा आपल्याच सहकारी आणि इतरांचा अडसर ठरताे. याशिवाय भुकेचे लक्ष्य गाठतानाही माेठी कसरत करावी लागते. मात्र, या साऱ्या परिस्थितीवर मात करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसताे, कदाचित पाेटातील भुकेची ही आगच त्याला साऱ्या गाेष्टींबद्दलची शिकवण देत असावी. यावरच मात करून ताे वाघ आपले आणि आपल्या बछड्याच्या भुकेचा प्रश्न मिटवून टाकताे. माेठ्या धाडसाने सामना करण्याच्या वाघाच्या याच वृत्तीचा त्या सहा वाघिणींवर माेठा सकारात्मक असा पडला.... आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाचा धाडसाने सामना करत आज चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबाच्या अभयारण्यामध्ये माेहर्ली गावातील सहा महिला गाइडचे काम करत आहेत. ताडाेबाच्या ८०० एकरावरच्या दाट जंगलाच्या किर्र झाडीत लपून बसलेल्या हिंस्र वाघाचे दर्शन आलेल्या प्रत्येक पर्यटकाला घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असताे. जिवावर बेतणारा हा संघर्षमय पल्ला गाठल्याशिवाय या गाइड असलेल्या वाघिणींना स्वत: आणि घरातील आपल्या बछड्यांच्या पाेटातील भुकेची आग शमवता येत नाही. त्यामुळेच माेहर्ली गावातील ३५ वर्षीय शहनाज बेगसह  काजल निकाेडे, माया जेंठे, वर्षा जेंठे, भावना वाढाई आणि गायत्री वाढाई या सहा महिला माेठ्या धाडसाने आणि चतुराईने या परिसरात गाइडचे काम करताना दिसतात.  पावलाेपावली जीवघेण्या हल्ल्याचा धाेका पत्करून या सहा वाघिणी आपल्या कुटंुबीयांच्या उदरनिर्वाहासाठी हे काम करताना दिसतात.२०० पुरुष गाइडमध्ये या सहा वाघिणींची ही कर्तबगारी निश्चितच डाेळ्यात भरणारी आहे. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता वाघाच्या बारीक हालचाली वेधून घेण्याची अचूक नजर त्यांच्या डाेळ्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्याला निसर्गाचा माेठा  ठेवा लाभलेला आहे. शहरापासूनच २२ किमी अंतरावर असलेल्या ताडाेबाच्या परिसरात किर्र झाडीचे माेठे  घनदाट जंगल आहे. ७०० पेक्षा अधिक एकरावर विखुरलेल्या या जंगलात माेठ्या संख्येत प्राणी आहेत. यामध्ये ८८ पेक्षा अधिक वाघांची संख्या आहे. त्यामुळेच  वाइल्डप्रेमींसाठी हे ताडाेबाचे जंगल म्हणजेच प्रत्यक्षात व्याघ्र दर्शनासाठीची पर्वणीच ठरते. यातूनच या ठिकाणी ‘याचि देही याचि डाेळा’ वाघाेबाच्या दर्शनासाठी देशभरासह विदेशातील पर्यटकांची माेठी गर्दी असते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या माेठ्या गर्दीचा विचार करून २०० गाइड माहिती  देण्यासाठी नियुक्त केले आहेत आणि त्यातच या सहा महिलांचाही समावेश आहे. काेअर झाेन म्हणजेच ताडाेबाच्या आतील घनदाट जंगलात या सहा महिला गाइड पर्यटकांना वाघाबद्दलची माहिती देत असतात. यासाठी आेपन जिप्सीतूनच हा सारा काही प्रवास करावा लागताे. त्यामुळे साहजिकच वाघाच्या जीवघेण्या हल्ल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यासारख्या निर्माण हाेणाऱ्या परिस्थितीचा माेठ्या धाडसाने सामना करण्याचे वाघासारखे काळीज या सहा महिला गाइडकडे आहे. यातूनच या गाइड दिवसातील आठ तास याच जंगलात जिवावर उदार हाेऊन वावरताना दिसतात. जंगलानजीकच्या गावातील लाेकांना उदरनिर्वाहासाठी ठाेस असा  माेठा पर्याय नाही. शेतीचा पर्याय नाही. त्यामुळेच यासाठी वन विभागाच्या वतीने जंगलाच्या परिसरातील गावच्या लाेकांना राेजगारासाठी गाइडचे प्रशिक्षण देण्यात आले. गावातील शहनाज बेगने स्वत:हून  गाइड होण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर २०१३ मध्ये त्यांची गाइडच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यापाठाेपाठ गावातील पाच महिलांनाही पुढाकार घेतला. परंपरेने पाचवीलाच पुजलेला संसाराचा रहाटगाडा हाकत या सहाही महिला धाडसाने गाइडची भूमिकाही यशस्वीपणे बजावत आहेत. भल्या पहाटे चारच्या टाेलावर उठायचे, घरातील सारे काही आवरायचे आणि पाच वाजचा गेटवर हजर व्हायचे, असाच यांचा नित्याचा दिनक्रम. त्यानंतर ११ वाजेच्या दरम्यान घरी परतून पुन्हा  संसाराची जबाबदारी. दुपारी दीडनंतर पुन्हा याच माेहिमेवर निघायचे. असे असतानाही कुठल्याही प्रकारची भीती वा नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही.

काॅल अलार्मचे प्रगल्भ ज्ञान : 


गाइडच्या भूमिकेत असताना चार तास जंगलातून भ्रमंती करत असताना माेठी खबरदारी बाळगावी लागते. यासाठी क्षणाक्षणाला परिसरातील बदलाचा आणि आवाजाचाही वेध घ्यावा लागताे. यातूनच अनेक वेळा  धाेक्याचे आणि संकटाचे संकेत मिळत असतात. यासाठी कान आणि डाेळे सदैव उघडेच ठेवावे लागतात. सांबर डिअर, बारकिंग आणि लंगूर (माकड) हे सातत्याने वाघ असलेल्या परिसरात काॅल देत असतात. यादरम्यानच्या या तिघांच्या हालचालीतूनच वाघ असलेल्या जागेचे लाेकेशन कळते. हेच चातुर्य या महिला गाइडमध्ये आहे. सांबर डिअर हे जमिनीवर पाय आदळते आणि शेपटी अधिक ताठ करते, यावरून परिसरात वाघ असल्याचे संकेत मिळतात. याशिवाय पक्ष्यांच्या बदलत्या आवाजावरूनही याची माहिती सातत्याने मिळत असते, हे सारे काही आता अंगवळणी पडल्याचे गाइड शहनाज बेग म्हणतात.विशीतल्या काजलचा संघर्ष


सहा गाइडमध्ये अत्यंत चाणाक्ष आणि प्रगल्भतेची मूर्तिमंत अशी काजल. कठीण संकटाने तिला परिस्थितीचा माेठ्या धाडसाने सामना करण्याचे शिकवले. तिच्यातली चंचलता आणि संवाद साधण्याची कला, लक्षवेधी ठरते. दुर्दैवाने लहानपणीच तिच्यावरचे छत्र हरवले. आपल्या दाेन बहिणी आणि भावांची जबाबदारी तिच्या काेवळ्या खांद्यावर पडली. या साऱ्या परिस्थितीचा सामना करत असताना तिला मावशीची माेलाची साथ मिळाली. यातून तिने शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या विशीत गाइडची नाेकरी पत्करली. आज ती यशस्वीपणे ठसा उमटवत आहे. प्रेमविवाह करत गाइडसह संसाराचीही माेठी जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याची तिची ही कसरत, निश्चितच वाखाणण्याजाेगी आहे.