आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तो’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस येताना एकटाच येत नाही. भूतकाळात सारलेल्या अनेक आठवणींच्या हातात हात घालून तो येतो. आणि मग स्मृतींचा हा पाऊस बरसतच राहतो. अशाच एका बरसणाऱ्या पावसाची आठवण...
 

पावसाच्या चार थेंबांसह तिने आपल्या माहेरी पाऊल ठेवलं. सारं वातावरण उत्साहात न्हाऊन निघालं. दाेन वर्षांपूर्वी उंबरठा आेलांडून गेलेली लेक माहेराला आल्याने घरात बाप अन् मायच्या उत्साहाला उधाण आलं हाेतं. तिनंही घाेटभर पाणी गळ्याखाली उतरवत आपल्या मंद पावलांनी साऱ्या घराचा ताबा मिळवला. सारे काही जिथल्या तिथेच हाेतं. तिच्याही मनात दाटलेला आनंद गगनात मावत नव्हता. ती सारं काही न्याहाळू लागली. तिची नजर खिडकीबाहेर गेली. मंदिराच्या पारावर चारचाैघांत बसलेल्या ‘त्याच्यावर’ तिची नजर खिळली. 

 

दाढीचे केस किंचित वाढलेले, डाेळे खाेल, चेहरा खप्पड झालेला. अशा अवतारातही त्याच्यातल्या वेगळेपणाने तिचं लक्ष वेधलं. तिच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माप आेलांडलं अन् तिने सासरी नव्याने संसार थाटला.तरीही त्याच्यासाेबतच्या आठवणी तिच्या मनात कायम हाेत्या. मनाेमन रंगवलेल्या सुखी संसाराचे चित्र अपूर्ण राहिल्याचा सल तिला बाेचत हाेता. शे-दाेनशे उंबऱ्यांच्या या गावात त्याचं व्यक्तिमत्त्व चारचाैघांत उठून दिसणारं. काेणीही भाळेल असं. याला ती तरी कशी अपवाद ठरणार? कृषीची माेठी डिग्री घेऊन ताे गावात परतला. पुण्यात इंजिनिअर असलेल्या आताच्या स्थळापेक्षाही तिला गावात साेशल वर्क करणाऱ्या त्याचीच अधिक भुरळ पडलेली हाेती.  गावातल्या सर्वच कामांत उत्साहानं ताे पुढे असायचा. त्यामुळेच त्याचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसणारं. कृषीची पदवी घेऊन आल्यापासून त्यानं बघता बघता दाेन वर्षांत बापाच्या हातातला सारा काही कारभार स्वत:कडे घेतला. वडिलांचा भार हलका केला. वडिलाेपार्जित धुऱ्यावरून असलेला वादही त्यानं मिटवला.  साऱ्या कर्तबगारीच्या कार्यात ताे नेहमीच अग्रेसर असायचा. हे सारं काही आठवत ती तशीच खिडकीपाशी थबकली हाेती. 

 

‘वर्षभरापासून सारं गणित हुकलं. बापानं दाेरीला  लटकून घेतलं. ताे आता सारं काही सावरण्यासाठी धडपडताेय. पण, निसर्ग काही साथ देईना. आेसाडलेलं रान ताे तुडवताेय. उद्याच्या आशेवर. म्हणूनच बिचाऱ्याची हाडंच राहिली,’ बयाेच्या वाक्यांनी ती भानावर आली. बयाेनं तिला गळ्याशी लावलं. तिच्या डाेळ्याच्या कडा पाणावल्या. तिनं हुंदका आवळला. त्याला पाहून तिच्या मनाची झालेली काहिली बयाेनं हेरली हाेती. काेपऱ्यात बसून तिनं वर्षभरात त्याच्यावर आेढवलेल्या संकटांची कथा तिला ऐकवली. तिच्या जिवाचा थरकाप झाला. बयाेच्या वाक्यांनी तिच्या पायाखालची जमीन सरकली. किती स्वप्नं रंगवली हाेती त्याच्यासाेबतच्या संसाराची. पण, पुण्याच्या या स्थळानं या साऱ्यांवर  पाणी फेरलं. आलिशान टू-बीचकेत थाटलेल्या संसारात अजूनही तिला गाेडी नव्हती. तिचं मनही कशातच रमेना. सातत्याने कुठल्याही परिस्थितीत असणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरचं ते  हसू आता लाेप पावलं हाेतं. पाण्याअभावी भेगाळलेल्या वावरागत त्याचा चेहरा झाला. काय हाेऊन बसलं....कधी सावरणार ताे या साऱ्या चक्रव्यूहातून....विचारात तिचे पाच-सहा दिवस असेच वाऱ्यागत निघून गेले. सकाळीच पती सुटाबुटात दारात उभा हाेता. सासरी पाठवण्यासाठी साऱ्यांची लगबग सुरू हाेती. मायनं तुकडा आेवाळला आणि तशी ती नवऱ्यासाेबत फाेर व्हीलरजवळ आली. धाकट्यानं गाडीच्या डिकीत सामान भरलं. आता आखाजीले पाठवा लेकीले, अशी विनंती माय आपल्या लाडक्या जावयाला करू लागली. तेवढ्यात ताे हातात दाेर घेऊन गाडीच्या समाेरून धावताना तिच्या नजरेत पडला.  बापासारखंच केलं तर....या विचारानं तिच्या काळजात धस्स झालं...अन् तिच्या पायाखालची जमीनच सरकली. डाेळ्यासमाेर अंधाऱ्या आल्या. कुणाचंही लक्ष जाण्याच्या आत बयाेनं तिचा हात धरला अन् ती बयाेच्या गळ्यात पडली.  बयाेनं तिच्या कानात सांगितलं अन् तिच्या जिवात जीव आला. भिऊ नकाे, पाखऱ्या बैल उधळल्यानं ताे दावं घेऊन पळताेय...
 

बातम्या आणखी आहेत...