Insiring: शंभरीतील आजोबांनी सलग 17 व्या लोकसभेसाठी सपत्निक केले मतदान, आठवणींना दिला उजाळा

दिव्य मराठी

Apr 23,2019 05:59:00 PM IST

औरंगाबाद - तरुणांसाठी एक आदर्श ठरतील अशा आजी-आजोबांनी आज मतदान केले आहे. वयाच्या शंभरीतील यशवंतराव बाळाजी साळवे यांनी 17 व्या लोकसभेसाठी सलग मतदान करण्याचा मंगळवारी हक्क बजावला. सोबत त्यांच्या पत्नी इंदिराबाईही होत्या. त्यांचे मात्र हे सोळावे मतदान आहे. इंदिराबाई जवळपास नव्वद वर्षांच्या आहेत. वयोवृद्ध साळवे दाम्पत्याने जळगाव रोडवरील फुलेनगरातील केंद्रावर मतदान केले. यशवंतराव यांनी पहिले मतदान केले ते लाडसावंगीत. मूळचे ते नजीकच्या पिंपळखुटा गावचे. इंदिराबाईंचेही पहिले मतदान लाडसावंगीतील. त्यांचे माहेर नजीकच्या लाडगावच्या.


दोघांनीही आतापर्यंत एकदाही मतदान चुकवले नसल्याचे सांगितले. दोघांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे. यशवंतराव सांगतात, "औरंगाबादेतील आमखास मैदानावर झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची त्याकाळची सभा ऐकण्यासाठी गावातून २०-२५ किमी अंतरायी पायपीट करून आलो होतो. तर जात्यावरील भीम गीते रचणा-या इंदिराबाई सांगतात की," मनमाडमध्ये झालेल्या सभेत बाबासाहेबांना पाहण्यासाठी गेले होते." बाबासाहेबांमुळे मतदानाचा अधिकार मिळाला आहे. म्हणून मतदानाचे वेगळे महत्व वाटते. मतदान करण्याचा दिवस हा सुटीचा दिवस नाही. तर आपला हक्क आणि अधिकाराचा योग्य वापर करण्याचा दिवस आहे. असे आजी-आजोबा सांगतात.

X