Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Electio2019: Surprise gift to Keral, Odisa, Bangal states

केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला मिळेल सरप्राइज गिफ्ट

सतीश वैराळकर | Update - Apr 16, 2019, 10:50 AM IST

‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर मनमाेकळी चर्चा केली.

 • Electio2019: Surprise gift to Keral, Odisa, Bangal states

  औरंगाबाद- गेल्या वेळी माेदींची लाट हाेती, आता मोदींची त्सुनामी आहे. या निवडणुकीत भाजपला केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांमधून सरप्राइज मिळेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केले. भाजप यंदा स्वत:च्या बळावर तीनशेचा आकडा सहज पार करणार असून, सहयोगी पक्ष अबकी बार चारशे पार करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आपण यंदा निवडणूक लढवत नसून भाजप व मित्रपक्षांच्या प्रचारासाठी देशभर फिरत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर मनमाेकळी चर्चा केली.


  प्रश्न : २०१४ च्या तुलनेत २०१९ ची निवडणूक साेपी जाणार नसल्याचे दिसते?
  हुसैन: गेल्या वेळी माेदींच्या नावावर भाजपने स्वबळावर २८३ जागा जिंकल्या हाेत्या. परंतु पोटनिवडणुकीत मोदींचा चेहरा नसल्याने मतदार स्थानिक उमेदवारास प्राधान्य देतात. मात्र, गेल्या ५ वर्षांत माेदींनी केलेल्या विकासकामांना डाेळ्यासमाेर ठेवून मतदारांनी त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे.


  प्रश्न : दक्षिण आणि उत्तर पूर्वेत पक्षाची काय स्थिती आहे?
  हुसैन : उत्तर प्रदेश, तेलंगणात भाजपची स्थिती मजबूत आहे. केरळमध्येही आपण सभा घेतल्या. तेलंगणा व आंध्रात विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत होत आहे. चंद्राबाबत नायडूंच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

  प्रश्न : शत्रुघ्न सिन्हांची समजूत काढण्यात तुम्ही यशस्वी ठरला नाहीत?
  हुसैन : मी, राजीव प्रताप रुडी, राधामोहन सिंह आदी नेत्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपविराेधा वक्तव्ये न करण्याचा सल्ला दिला हाेता, मात्र त्यांनी एेकला नाही. पक्षाने त्यांची उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतला हाेता, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेले.


  प्रश्न : बिहारच्या तडजोडीत पक्षाने आपणास गमावले?
  हुसैन : मी मागील पाच टर्मपासून खासदार म्हणून लढायचो, परंतु यंदा मी उमेदवार नसल्याने देशभर प्रचार करायला मिळत आहे. बिहारमध्ये आम्हाला ३९ जागा मिळतील. उत्तर प्रदेशात ७४, महाराष्ट्रात ४८ जागा मिळतील. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये मात्र काही जागा कमी हाेतील.


  प्रश्न : प्रियंका गांधींचा कितपत फायदा काँग्रेसला होईल?
  हुसैन : प्रियंका गांधी यंदा प्रथमच राजकारणात येत नाहीत. २००४, २००९ व २०१४ मध्ये त्या प्रचारात होत्या. त्यांच्या आल्याने किंवा बाहेर राहिल्याने काँग्रेसला काहीच फायदा अथवा नुकसान होणार नाही. काँग्रेस मानसिकदृष्ट्या निवडणूक हारलेली आहे. यांच्याकडे प्रचारासाठी नेते नसल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा वापर केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी टीम’ म्हणून हाेणारा प्रचारही खाेटा आहे, असेही त्यांनी दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Trending