आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक रिपोर्ट: बिहारमध्ये लाटेच्या झंझावातात बाहुबलींशी दोन हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात प्रत्येक तिसर्‍या उमेदवारामागे बाहुबली आणि प्रत्येक जागेवर जातीय समीकरणातील उमेदवार अशी स्थिती आहे. इथे विकासाचा मुद्दा नाही तसेच बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही नाही. भाजप वगळता अन्य सर्व पक्षांनी धर्मनिरपेक्ष बिहारची घोषणा दिली आहे. जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी देशभरात कॉँग्रेस आणि बिहारमध्ये राजदला मुस्लिमांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केल्यामुळे धर्मनिरपेक्षेतेचे तापमान वाढले आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या कामगिरीव्यतिरिक्त प्रादेशिक पक्षांच्या स्थितीवर प्रकाश टाकल्यास नितीश कुमार यांच्यापेक्षा लालूप्रसाद यादव यांच्या सभेस गर्दी होत असल्याचे दिसत आहे. लालू यांच्या छबीमुळे की सत्ताविरोधी लाट, यापैकी कोणते कारण हे स्पष्ट नाही. मात्र, बिहारमध्ये अल्पसंख्याक वर्ग सुरुवातीपासूनच कॉँग्रेस-राजद आघाडीकडे झुकला आहे. या आघाडीसाठी हा जेवढा फायद्याचा सौदा आहे तेवढाच नुकसानीचाही. ज्या जागेवर भाजप आणि जदयूमध्ये लढत आहे तिथे मुस्लिम मतदार जदयूसोबत आहेत. नितीश कुमार यांची बिहारमध्ये व्होट बॅँक आहे, ती आजही त्यांच्यासोबत दिसते. बळकट जातीय समीकरणाच्या आधारे बाहुबली उमेदवार रिंगणात आहेत. अशात मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांना आणखी बळ मिळत आहे. बिहारमध्ये जातीय मतांच्या ध्रुवीकरणास राजकारण संबोधले जाते. मात्र, या वेळी वैचारिक मुद्द्यावर मतविभाजन होणार हे ठरलेले आहे आणि त्यात भाजपला आशादायक वातावरण आहे.
बिहारमध्ये प्रादेशिक पक्षांच्या प्रभावाशिवाय भाजपच्या नमो घोषणेची छाप दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत झालेल्या सभांना लाट संबोधल्यास ते वावगे ठरू नये. बिहारच्या मागासपणासाठी ते प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढवतात. मात्र, त्याचबरोबर बिहारच्या सत्तेत जदयूसोबत 8 वर्षे भाजपने सत्तासोबत केल्याचे ते सोयीस्करपणे विसरणे पसंत करतात. मोदींच्या निशाण्यावर जदयू-राजद व कॉँगे्रस आहेत.
निवडणुकीदरम्यान एक मुद्दा इथे चर्चेत आला आहे, तो म्हणजे भाजप-जदयू युती तुटली नसती तर काय झाले असते? यावर अभिनेते व भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, आघाडी तुटली नसती तर भाजपलाच फटका बसला असता. भाजपला असे वातावरण कधीच मिळाले नसते. बिहारच्या दुर्दशेबद्दल मोदी यांनी कोणाला दोष दिला असता हेही एक वास्तव आहे. रालोआची प्रचार मोहीम राजद आणि कॉँग्रेसवर निशाणा साधल्याशिवाय पूर्ण होत नाही. लोक विचारत नसले तरी बिहारच्या रखडलेल्या विकासासाठी एकटा जदयू नव्हे, तर भाजपही जबाबदार असल्याचे त्यांना वाटते.
बिहारच्या ग्रामीण भागात लोक नेत्याऐवजी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, मोदी यांची गर्दीसोबत जोडण्याची कला येथे चर्चेचा विषय आहे. ते लोकांना प्रश्न विचारतात- कॉँग्रेसने 100 दिवसांत महागाई संपण्याचे आश्वासन दिले होते, पूर्ण झाले? लोकांतून उत्तर येते- नाही. उपस्थितांशी साधलेल्या संवादाचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीबरोबर इथे विधानसभेचेही चित्र स्पष्ट होत आहे. नितीश कुमार यांनी लोकसभेत चांगले यश मिळवले नाही तर त्यांना सरकार चालवणेही अवघड होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. भविष्याची चिंता भेडसावल्यामुळे त्यांचे अनेक शिलेदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे नितीश कुमार लोकसभा निवडणुकीत विधानसभेचीही परीक्षा देत आहेत, हे स्पष्ट आहे.
बिहारमधील जनमत चाचणी अहवालात जदयूचा आलेख लालूप्रसाद यांच्यापेक्षाही घसरला आहे. बुखारी यांच्या फतव्याचा लालूंना फायदा झाल्यास त्यांच्या जागा आणखी कमी होतील. देशाच्या राजकारणात बिहारची भूमिका मोठी आहे.
या निवडणुकीतही बिहार देशाच्या राजकारणात मोठी भूमिका निभावेल. याला तुम्ही भविष्यवाणी म्हणा की निवडणूक विश्लेषण, मात्र ही वस्तुस्थिती आहे.
० लेखक नॅशनल सॅटेलाइट एडिटर आहेत.