आचारसंहिता : सरकार, पक्ष व आपल्यावर काय परिणाम

लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यासह देशात मोठे बदल दिसतील.

Mar 11,2019 11:06:00 AM IST

लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यासह देशात मोठे बदल दिसतील. उदाहरणार्थ राज्य, केंद्र आणि सार्वजनिक उपक्रमांच्या वेबसाइटवरून मंत्री व पक्षांचे संदर्भ असलेले फोटो हटवण्यात येतील. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्याही नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत लांबणीवर पडतील. आधीच जाहीर व शुभारंभ झालेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर मात्र आचारसंहितेचा कोणताही परिणाम होणार नाही.


सरकारी जाहिराती बंद
सरकारी खर्चाने सरकारच्या उपलब्धींच्या मुद्रित, टीव्ही,रेडिओ आणि वेबवरील जाहिराती आता प्रकाशित होणार नाहीत. घोषणा, उद््घाटने, लोकार्पण, कामांचा शुभारंभही होणार नाही.


बदल्या, नियुक्त्या थांबणार
केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग, कार्यालयांत आता कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या होणार नाहीत. एखादा अधिकारी बदलायचा असेल तर तो निवडणूक विभागच बदलू शकतो.


सरकारी वाहने जमा
सरकारी विमाने,वाहने आणि मशिनरीचा वापर निवडणूक प्रचारात पूर्णपणे प्रतिबंधित आहे. मंत्री, संसदीय सचिव वगळता विविध मंडळे आणि आयोगांच्या अध्यक्षांची सरकारी वाहने जमा केली जातील.


धार्मिक स्थळी प्रचार नाही
सर्वसामान्यांप्रमाणेच निवडणुकीतील उमेदवार कोणत्याही धार्मिक स्थळी वा कार्यक्रमांत जाऊ शकतील. मात्र त्यांना तेथे आपला व पक्षाचा निवडणूक प्रचार करता येणार नाही. तसे झाल्यास कारवाई केली जाईल.

X