Home | Divya Marathi Special | Election Analysis: Before the Conflict, Then Together; MNS's mere neutrality

निवडणूक विश्लेषण : आधी भांडले, मग एकत्र आले तरीही युतीने राखली सत्ता; मनसेची मात्र निष्प्रभता

गायत्री लेले | Update - May 25, 2019, 10:09 AM IST

राष्ट्रीय यश स्थानिक पातळीवर कसे काम करणार याची उत्सुकता

 • Election Analysis: Before the Conflict, Then Together; MNS's mere neutrality

  गेल्या ४ वर्षांत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांकडे पाठ फिरवून वेगळ्या वाटा शोधण्याचा पवित्रा सातत्याने घेत होते. नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा करून हिंदुत्वाला साद घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा या कुरबुरींना आणखी बळ मिळाले. माध्यमांनीही ही नोकझोक उचलून धरली होती. त्यानंतर २-३ महिन्यांत चित्र पालटले व शिवसेना-भाजपने एकत्र यायचा निर्णय घेतला. फेब्रुवारीत उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी दोन्ही पक्षांनी “विचारसरणी’ एक असल्याचे नमूद केले. त्यात राष्ट्रवादाचा व राम मंदिराचा तसेच २५ वर्षे शिवसेना-भाजप एकत्र आहोत, याचीही आठवण करून देण्यात आली. सरतेशेवटी लोकसभेसाठी भाजप २५, तर शिवसेना २३ जागा लढवेल हे जाहीर केले गेले. अमित शहाही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते, त्यांनी युती ४५ जागा जिंकेल, असे भाकीत केले. नुकत्याच लागलेल्या निकालांत हे भाकीत जवळपास खरे ठरलेे. सध्या शिवसेना-भाजप एकत्र विजय साजरा करत असल्याची दृश्ये सगळीकडे पाहायला मिळत आहेत.


  शिवसेनेने मारलेली ही मुसंडी नोंद घेण्यासारखी असून त्यामागच्या कारणांची मीमांसा करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, शिवसेनेने योग्य वेळेस भाजपशी पुनश्च हस्तांदोलन करून “लहान भावाची’ भूमिका पत्करली असे म्हणता येईल. खरे तर मूळच्या “मोठा भाऊ’ असलेल्या सेनेला हे आधी मान्य नव्हते. जागावाटपावरून त्यांचे भाजपशी अनेकदा कलहही झाले. परंतु साधारण वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत हे पाहून सेनेने जुळवून घेतले आणि त्याचा फायदा झाला. शिरूरमधून सेना सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हेंचा विजय झाला. परंतु एखाद्या पराभवाने सेनेला फारसा फरक पडला नाही. कारण यामुळे सत्तास्थापनेत भाजपकृपेने काही अडचण येणार नाही. दुसरे म्हणजे, सेना- भाजपसमोर निष्प्रभ ठरलेले विरोधी पक्ष. उदाहरणार्थ पालघरात शिवसेनेच्या राजेंद्र गावितंविरोधात बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप यांनी महाआघाडी केली. बहुजन विकास महाआघाडीचे बळीराम जाधव यांच्याशी त्यांची लढत होती. एवढे होऊनही गावितांचा येथे विजय झाला.

  परभणीतही शिवसेनेने पुनश्च स्थान राखले. येथेही सेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्यासमोर राष्ट्रवादीचे मोठे आव्हान होते. जाधव यांनी ही लढत “नेता विरुद्ध कार्यकर्ता’ अशी असल्याचे नमूद करून हा कार्यकर्त्याचा विजय असल्याचे सांगितले. मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागांवर तसेच ठाणे आणि कल्याणमध्येसुद्धा असेच विजयाचे वातावरण दिसून येत आहे.


  विरोधी पक्षांनी सेना-भाजपला निष्प्रभ करण्याचे प्रयत्न केले नाहीत असे नाही. मनसे यात आघाडीवर होती. मनसेने एकही जागा न लढवता केवळ भाजपवर पुराव्यानिशी टीका करण्यासाठी सभा घेतल्या, राज ठाकरेंनी यात भाजपच्या विरोधात अनेक व्हिडिओ दाखवले. ही मोहीम “लाव रे तो व्हिडिओ’ या नावाने प्रसिद्ध झाली. राज ठाकरे यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत असल्याचेही माध्यमांमधून सांगितले गेले. आता निकाल लागल्यानंतर मनसेच्या या प्रयत्नांचा फारसा काही उपयोग न झाल्याचे दिसून येते आहे. यासाठी मुख्यतः दोन शक्यता वर्तवता येतील. पहिली म्हणजे या ऑडिओ- व्हिज्युअल सभांना बऱ्याच जणांनी केवळ मनोरंजनात्मक मूल्य दिले असण्याची संभावना आहे. भाजपविरुद्ध जनमत तयार करण्याचा जो मुख्य उद्देश होता तो त्यामुळे सफल झाला नाही. दुसरे म्हणजे मनसेचा परिघ काही शहरी भागांपुरता मर्यादित आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही. राज ठाकरे यांनी नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, महाड (रायगड), मुंबईत काळाचौकी, भांडूप, कामोठे (पनवेल) आणि नाशिकमध्ये सभा घेतल्या होत्या. मात्र त्यापैकी बहुतेक सगळ्या मतदारसंघांत जनतेने राज ठाकरे यांचे ऐकून भाजपच्या विरोधात मतदान केले आहे असे चित्र दिसत नाही. उलट त्यांच्या पारड्यात भरभरून मते पडल्याचे दिसून आले. यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज ठाकरेंनी निकालसंदर्भात ‘अनाकलनीय’ अशी प्रतिक्रिया देताच अनेक लोकांनी त्यावर ‘गुड मॉर्निंग’ असे लिहायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंनीही ‘लाव रे व्हिडिओ’ची खिल्ली ‘लाव रे फटाके’ असे म्हणून उडवली. देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनी नकारात्मक प्रचार केल्याने त्यांचा पराभव झाल्याचे नमूद करत मनसेला टोला लगावला.

  राष्ट्रीय यश स्थानिक पातळीवर कसे काम करणार याची उत्सुकता
  राज ठाकरे यांच्या झंझावातामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा केली जात होती, ज्याची शक्यता या निवडणुकीच्या निकालामुळे डळमळीत झाली आहे की काय असे चित्र आहे. प्रत्यक्षात काय होते हे पाहायला काही महिने वाट पाहावी लागेल. सध्या भाजपला राष्ट्रीय पातळीवर मिळालेले हे अभूतपूर्व यश स्थानिक पातळीवर कसे काम करते हे पाहणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात सेना-भाजप समीकरणावरही याचा प्रभाव असेल हे निश्चित!

  gayatrilele05@gmail.com

Trending