आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक विश्लेषण : ‘वंचित’च्या उमेदवारांनी ठेवले आघाडीच्या चौघांना विजयापासूनच वंचित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातल्या आठ पैकी चार मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. प्रदेशाध्यक्ष असलेले काँग्रेसच्या अशोक चव्हाण हेही त्यातून सुटलेले नाहीत. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यात त्यांना आलेल्या अपयशाचा त्यांनाच असा फटका बसला आहे. औरंगाबादमध्ये मात्र, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमच्या उमेदवाराला  शिवसेनेतून बाहेर पडलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी निवडून आणले आहे. हिंदू मतदारांच्या मतांमध्ये झालेली विभागणी इम्तियाज जलील यांच्या यशाची पायाभरणी करून गेली आहे. 

 


औरंगाबाद : जाधवांचा ‘रिव्हेंज’
खासदार असलेल्या खैरे आणि शिवसेनेचेच आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांच्यात गेल्या दोन वर्षांत जुंपली होती. खैरंेकडून दुखावलेल्या हर्षवर्धन यांनी खैरे यांना धडा शिकवायचा विडाच उचलला होता. त्यामुळे आज स्वाभाविकच स्वत: पराभूत झाल्याच्या दु:खापेक्षा त्यांना खैरे पराभूत झाले याचाच अानंद अधिक असणार. त्यांनी उमेदवारी केली नसती तर खैरे निश्चितपणे निवडून आले असते. आंबेडकर समर्थक मतदारांनी इम्तियाज यांना १०० टक्के साथ दिली, हे या निकालाने सिद्ध केले आहे. औरंगाबाद ही प्रकाश आंबेडकर यांची मोठी ताकद बनली आहे, असाही याचा अर्थ आहे.

 


नांदेड : वंचितने केला ‘गेम’
अशोक चव्हाण यांना दिल्लीत जाण्यात रस नव्हताच. त्यांच्यावर उमेदवारी थोपवली गेली होती. अशा स्थितीत त्यांच्या पराभवाचे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात. वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांच्यामागे आंबेडकरवादी मतदार १०० टक्के गेले असले तरी मुस्लिम मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात अशोकराव यशस्वी ठरले, असे जे सांगण्यात येत होते, ते खरे नव्हते हे आता सिद्ध झाले आहे. ‘वंचित’ नेच त्यांचा गेम केला आहे.

 


परभणी : राष्ट्रवादीची निराशाच
राष्ट्रवादीचे राजेश विटेकर निवडून येतीलच, असा विश्वास खुद्द शरद पवार यांनाही शेवटपर्यंत होता. पण इथेही वंचित आघाडीच्या आलमगीर खान यांनी तब्बल दीड लाख मते घेतली आणि विटेकर अवघ्या ३५ हजार मतांनी पराभूत झाले. शिवसेनेच्या संजय जाधव यांच्याविषयी असलेली नाराजी सहजपणे जाणवत असूनही त्यांना वंचित आघाडीने तारले. वंचितने बाहेरचा उमेदवार असल्याने मुस्लिम मतदार साथ देणार नाहीत, हा अंदाज स्थानिक मतदारांनी इथे खोटा ठरवला आहे.

 


उस्मानाबाद : मोदी ‘फॅक्टर’ ही..
शिवसेनेच्याच मावळत्या खासदाराची नाराजी आणि राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह यांची चांगली प्रतिमा यामुळे इथेही राष्ट्रवादीला मोठ्या आशा होत्या. पण वंचित आघाडीचे अर्जुन सलगर यांनी तब्बल लाखभर मते मिळवून इथेही शिवसेनेला विजय सोपा करून दिला. त्यात औसा येथे झालेली मोदी यांची जाहीर सभा युुतीच्या फायद्याची ठरली. केवळ औसा विधानसभा मतदारसंघातूनच ५५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य सेनेच्या ओमराजे निंबाळकरांना मिळाले आहेे.

 


लातूर : अपेक्षितच निकाल 
लातूर मतदारसंघातून भाजपचे सुधाकर शृंगारे निवडून येतील, या विषयी कोणालाच शंका नव्हती. भाजपने हा मतदारसंघ बऱ्यापैकी स्वत:कडे खेचून घेतला आहे. या वेळी त्यांनी उमेदवार बदलला तरीही फारसा फरक पडला नाही. निवडणूक प्रचाराच्या काळात इथे ज्या प्रमाणात मोदींविषयीच्या सकारात्मक भावना सर्वच घटकांत पाहायला मिळाल्या होत्या त्या प्रमाणात म्हणजे सुमारे पावणेतीन लाख मतांची आघाडी शृंगारे यांनी घेतली आहे. 

 


बीड : परंपरा राखण्यात यश
मागच्या पोटनिवडणुकीत डाॅ. प्रीतम मुंडे यांनी विक्रमी आघाडी घेतली होती. या वेळी ती कमी झाली असली तरी पावणेदोन लाखांहून अधिक मताधिक्य मिळवण्यात त्यांना यश आले आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरची ही दुसरी निवडणूक. त्यातही विजयाची परंपरा कायम राखण्यात डाॅ. प्रीतम यांना आणि मंत्री पंकजा यांनाही यश आले आहे. इथे पहिल्यांदाच जातीय ध्रुवीकरण तीव्र झाले होते. तरीही डाॅ. प्रीतम यांनी हे यश मिळवले आहे, हे विशेष. 


 

जालना : मताधिक्यातही नेता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष इथे सुमारे सव्वातीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. शिवसेनेच्या खोतकरांनी त्यांना प्रामाणिक साथ दिल्याचेच हे द्योतक आहे. मराठवाड्यातील युतीच्या उमेदवारांमध्ये मताधिक्यातही ते नेते ठरले आहेत. पद आणि सत्ता यांचा उपयोग करून त्यांनी गेल्या पाच वर्षांत जी कामे मतदारसंघात केली, त्याचेच हे फळ असावे.

 


हिंगोली : काँग्रेसचा आत्मघात

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नाराजी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पक्षांतराचा धडाका शिवसेनेच्या हेमंत पाटलांना ते नांदेडचे असूनही  विजयी करून गेला आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने ते निवडून आले आहेत. वंचितच्या मोहन राठोड यांनी १.६४ लाखांहून अधिक मते मिळवली. पण ती काँग्रेसच्या पारड्यात गेली असती तरी इथे त्यांचा निकालावर परिणाम झाला नसताच.

 

मराठवाडा झाला भगवा
मागच्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले होते. दोन उमेदवार काँग्रेसचे विजयी झाले होते. यंदा भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांनी काँग्रेसकडे असलेले दोन मतदारसंघ वाटून घेतले आहेत. त्यामुळे आता भाजपचे चार तर शिवसेनेचे तीन खासदार मराठवाड्यात असतील. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा थोडक्यात पराभव झाला नसता तर पहिल्यांदाच संपूर्ण मराठवाडा युतीच्या ताब्यात गेला असता. तरीही तो जवळपास भगवा बनला आहेच. 

 

काय असेल विधानसभेचे चित्र?

> लोकसभेच्या या निकालांमुळे मराठवाड्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आत्मविश्वास गमावून बसण्याची शक्यता आहे. तसे झाले तर त्याचा सहज लाभ युतीला होऊन त्यांच्या जागा वाढतील.

 

> मुस्लिम आणि आंबेडकरी ताकद एकत्र आली तर काय घडू शकते, हे या निकालांनी दिसले आहे. ही संयुक्त ताकद विधानसभा निवडणुकीत मोठी उलथा पालथ करू शकते. विशेषत: उमेदवारांची जातनिहाय निवडच निकाल ठरवेल. 


> बंडखोरी रोखण्यात प्रमुख पक्षांना जितके अपयश येईल तितक्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांचे यश वाढणार आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर असेल.