आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक विधानसभेची, मात्र खासदारांच्या प्रतिष्ठा पणाला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विधानसभा निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व कोणाचे याचा निर्णय लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन खासदारांसह माजी मुख्यमंत्र्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोकरमधून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणावर १९६२ पासून चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ते अबाधित होते. परंतु लोकसभा निवडणुकीत चव्हाणांचा पराभव झाल्यानंतर सत्तेचा केंद्रबिंदू प्रताप पाटील चिखलीकर झाले. आपले वर्चस्व पुन्हा स्थापित करण्यासाठी चव्हाणांना स्वत:च्या विजयासोबतच जिल्ह्यातून काँग्रेसचे अधिकाधिक आमदार निवडून आणावे लागतील. खासदार प्रताप पाटील काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून ते चव्हाणांच्या विरोधात आहेत. संपूर्ण जिल्ह्यात प्रखर चव्हाण विरोधी नेता अशी चिखलीकरांची ओळख आहे. त्यामुळे चिखलीकरांचे वर्चस्व संपवण्यासाठी चव्हाणांना काँग्रेसला मोठा विजय मिळवून द्यावा लागेल. 
हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार असले तरी त्यांचे सर्व साम्राज्य नांदेड जिल्ह्यात आहे. त्यांच्या राजकारणाची मुहूर्तमेढ येथेच रोवली गेली. प्रकाश खेडकर यांच्या निधनानंतर हेमंत पाटील हेच शिवसेनेचे महत्वाचे नेते झाले. या निवडणुकीत त्यांनी पत्नी राजश्री पाटील यांना उभे केले. त्यांच्या विजयासह इतर मतदार संघातील शिवसेनेच्या आमदारांना विजयी करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ते खासदार असल्याने नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील सेनेेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून त्यांना मातोश्रीवरील आपले वजन वाढवण्याचे आव्हान आहे. या निवडणुकीत शिवसेनेला कमी जागा मिळाल्या तर त्याचा फटका हेमंत पाटील यांनाच बसणार आहे. 
 

जास्त आमदार निवडून आणण्याचे चिखलीकरांसमोर आव्हान

लोकसभा निवडणुकीत मोदींची सुप्त लाट व वंचित बहुजन आघाडी या दोन कारणामुळे प्रताप पाटलांचा विजय झाला. अशोक चव्हाणांसारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून चिखलीकर जायंट किलर ठरले. सध्या त्यांचा शब्द भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात अंतिम मानला जातो. जिल्ह्यातील भाजपचा कारभारही त्यांच्याच मतानुसार चालतो. त्यांना हे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे लागतील. तांत्रिकदृष्ट्या भाजप भोकर, मुखेड या दोनच जागा लढवत असला तरी किनवट, नायगाव या मतदार संघातही कमळच चिन्ह आहे. त्यामुळे या जागा निवडून आणण्याची जबाबदारी चिखलीकरांवरच आहे. चव्हाणांसारख्या मातब्बर नेत्याकडून जिल्ह्याच्या कारभाराची सर्व सूत्रे स्वत:कडे घेण्यासाठी आपल्या पक्षाचे जास्तीत आमदार निवडून आणणे हे मोठे आव्हान चिखलीकरांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने माजी मुख्यमंत्र्यांसह दोन खासदारांची प्रतिष्ठा पणाला आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...