Home | National | Delhi | election commission of india declares lok sabha election time table live news

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेः देशात 7 तर महाराष्ट्रात 4 टप्प्यांत मतदान, 23 मे रोजी निकाल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 10, 2019, 06:23 PM IST

महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये होणार मतदान

 • election commission of india declares lok sabha election time table live news

  नवी दिल्ली - निवडणूक आयोगाकडून देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीचा पहिल्या टप्प्याला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत मतदान पार पडणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत औपचारिक माहिती देण्यात आली. या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली. तारखांसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विविध मतदार संघ, राज्यांचे दौरे केले. शाळा, महाविद्यालयांच्या आणि बोर्डाच्या परीक्षा, सुट्ट्या, उत्सव या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. असेही मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. सोबतच, मतदारांना यावेळी नोटाचा अधिकार सुद्धा वापरता येईल.

  महाराष्ट्रात 4 टप्प्यांत, अशा आहेत मतदानाच्या तारखा
  पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार आहे. यानंतर 23 मे रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत.

  महाराष्ट्रात मतदानाच्या तारखा
  11 एप्रिल 7 जागांवर मतदान
  18 एप्रिल 10 जागांवर मतदान
  23 एप्रिल 14 जागांवर मतदान
  29 एप्रिल 17 जागांवर मतदान


  प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर, सोशल मीडिया, पेड न्यूजवर करडी नजर
  - 90 कोटी लोक बजावणार मतदानाचा अधिकार
  - दीड कोटी मतदारांचे वय 18-19 वर्षे, 1.60 कोटी नोकरीपेशा मतदार
  - लोकसभेत प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार
  - 10 लाख पोलिंग स्टेशन वापरले जातील
  - मतदानाच्या 48 तासांपूर्वी बंद होणार लाउडस्पीकर
  - रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाउडस्पीकरवर बंदी
  - अधिक माहितीसाठी आयोगाकडून 1950 हेल्पलाइन
  - आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई
  - यावेळी मतदारांना नोटा अधिकार वापरता येणार
  - तक्रार नोंदवण्यासाठी Android App, 100 तासांत उत्तर देतील अधिकारी
  - ईव्हीएमच्या हालचालींवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमने नजर ठेवणार
  - संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची, मतदानाची व्हिडिओग्राफी
  - निवडणुकीत मीडियाची सकारात्मक भूमिका, पेड न्यूज विरोधात सक्त कारवाई केली जाणार
  - सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा निवडणूक आयोगाची करडी नजर

  असे होते 2014 च्या लोकसभेचे चित्र...
  2014 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ 3 जून रोजी संपुष्टात येत आहे. 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत बहुमताचा आकडा 272 आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल 282 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या नेतृत्वातील एकूणच राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडे सध्या 336 जागा आहेत. लोकसभेत विरोधी पक्ष नेता होण्यासाठी राजकीय पक्षाला सभागृहात किमान 10 टक्के जागा जिंकाव्या लागतात. परंतु, 10 वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 44 जागा मिळाल्या. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोग विविध मतदार संघाचे दौरे करून आकडेवारी गोळा करत होता. निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करता येतील, तसेच सर्वच मतदार संघ निवडणुकीसाठी तयार आहेत का याचा देखील अभ्यास करण्यात आला.


  यापूर्वी 2004 मध्ये रविवारीच झाली घोषणा
  निवडणूक आयोगाकडून सहसा रविवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जात नाही. तरीही आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी रविवारचा दिवस निवडला आहे. यापूर्वी 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा रविवारीच करण्यात आली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि दिग्गज नेते शरद पवार यांनी देखील मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीच्या घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली होती. तर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यासाठी होणाऱ्या विलंबावरून निवडणूक आयोगावरच निशाणा साधला होता. 2014 च्या लोकसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येत आहे.

Trending