आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8.94 कोटींवर मतदार निवडणार 288 आमदार, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात राजकीय वातावरण तापले असताना आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यात ईव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय व पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. सिंह यांनी ‘हा पत्रकार संवाद केवळ निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी असून निवडणूक तारखा जाहीर होण्याशी काहीही संबंध नाही’ असे प्रारंभीच स्पष्ट केले.  

मतदार नोंदणीची संधी : ३१ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. असे असले तरी नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापूर्वी १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. यामुळे यापूर्वी नोंदणी करू न शकलेल्या मतदारांना अजूनही मतदार नोंदणीची संधी आहे, असेही सिंह म्हणाले.

लोकसभेच्या तुलनेत मतदान केंद्रे ८०० ने वाढणार : राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ९१ हजार ३२९ मतदान केंद्रे होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४,१४४ केंद्रांच्या वाढीसह एकूण ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे होती. लोकसभेच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या ७०० ते ८०० ने वाढण्याची शक्यता आहे. 

पूरग्रस्तांना मोफत मतदार ओळखपत्रे : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरामुळे कागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्रे देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.

मतदारांसाठी महत्त्वाचे : 
- मृत, अन्यत्र स्थलांतरीत, किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळली आहेत. अंतिम मतदार यादी https://ceo.maharashtra.gov.in  सह जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदारांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. 
- मतदारांनी नाव यादीमध्ये आहे की नाही याची पडताळणी करता येईल. वगळलेल्या नावांबाबत समस्या असल्यास पुराव्यांच्या आधारे पुन्हा मतदार नोंदणी करता येईल. 
- ऑनलाइन मतदार नोंदणी तसेच यादीतील तपशीलात बदलांसाठी ऑफलाइन व www.nvsp.in  या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

बातम्या आणखी आहेत...