आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन प्रचारावर नजर; मंत्रालयामध्ये ४ वॉर रूम, २० टीव्हीवर मॉनिटरिंग, मुद्रित माध्यमे-सोशल मीडियावरही वॉच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीत ऑनलाइन प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. यासाठी आयोगाने पोलिस खात्याच्या सायबर सेलशी हातमिळवणी केली असून मतदानापर्यंत हा सेल आयोगाच्या अखत्यारीत काम करेल. ऑनलाइन प्रचारावर निगराणीसाठी मंत्रालयात ४ वॉर रूम आहेत. सोशल मीडियावर धार्मिक, जातीयवादी, मॉब लिंचिंग, चिथावणी देणाऱ्या तसेच समाजात तणाव निर्माण करणाऱ्या पोस्टचा शोध घेऊन त्या टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. प्रसंगी याचा खर्चही उमेदवाराच्या खात्यात टाकला जाणार आहे.
निवडणूक आयोगाने ऑनलाइन प्रचारावर यावेळी अधिक गांभीर्याने लक्ष दिले आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. सायबर सेल ऑनलाइन गुन्ह्यांवर पाळत ठेवण्यात तरबेज समजला जातो. यामुळे मतदानापर्यंत हा सेल पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत काम करणार असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
 

पाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर
प्रचार साहित्यावर नजर ठेवण्यासाठी मंत्रालयाच्या खालच्या मजल्यावर राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने निवडणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. यात एकूण ४ वॉर रूमचा समावेश आहे. 
 

वाॅर रूम. 1
निवडणूक आयोगाच्या पहिल्या वॉर रूममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर नजर ठेवली जात आहे. येथे २० एलईडी टीव्ही बसवण्यात आले आहेत. दिवसभर चॅनेल्सवरील कंटेंटची पाहणी केली जात आहे.
 

वॉर रूम 2
यात मुद्रित माध्यमांतील शब्द न् शब्द नजरेखालून घालण्यासाठी खास टीम आहे. ती जाहिराती आणि पेड न्यूजवर नजर ठेवून आहे. एखादी बातमी जाहिरात स्वरूपाची वाटली तर तिची चौकशी करून कारवाई करेल.
 

वॉर रूम 3
“सायबर मॉनिटरिंग अँड ट्रोलिंग सेल’च्या मदतीने फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर व शेअरचॅटवर नजर. उमेदवारांच्या फेसबुक पेजेससह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पेजेसवरही आयोगाचे बारीक लक्ष आहे. 
 

अशी कारवाई :
सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो, व्हिडिओमुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आले तर सुरुवातीला ती काढून टाकण्यात येते. यानंतर खातेधारकाला खुलासा मागून तो समाधानकारक नसल्यास गुन्हा दाखल केला जातो. 
 

cVigil अॅपवर तक्रार :
आचारसंहिता भंगाची माहिती मिळाल्यास आयोगाच्या cVigil या अॅपवर तक्रार नोंदवता येते. 
 

...तर गुन्हा दाखल 
बहुतांश लाेक पोस्टची शहानिशा न करता ती फॉरवर्ड करतात. यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकताे. उमेदवाराची प्रतिमा मलीन होऊ शकते. आचारसंहितेसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांनीच अशा पोस्टपासून दूर राहावे. उलट अशा तक्रारी देण्यासाठी  सहकार्य करावे.
-दिलीप शिंदे, निवडणूक आयोग
 
 

बातम्या आणखी आहेत...