आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक, निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने घटणार? 2014 च्या निवडणुक वेळी यूएई आणि भारतात अशा दोन टप्प्यात घेतली होती स्पर्धा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल १२व्या पर्वाच्या हंगामी कार्यक्रमाची घोषणा बीसीसीआयच्या वतीने येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. २००९ च्या देशांतर्गत निवडणुकांदरम्यान संपूर्ण आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी स्पर्धेचा पहिला टप्पा यूएईमध्ये घेऊन उर्वरित स्पर्धा भारतात घेतली गेली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा घेतल्यामुळे परकीय चलन घोटाळ्याचे पडसाद अजूनही बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांवर उमटले आहेत. 

 

त्या धास्तीमुळे यंदा स्पर्धेच्या काही सामन्यांना कात्री लावून स्पर्धा भारतातच घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्यानुसार ही स्पर्धा २३ मार्च रोजी सुरू करण्यात येईल, असे बीसीसीआयने जाहीरही केले होते. स्पर्धा १२ मेपर्यंत संपवण्यासाठी त्यांनी नियोजनही केले होते. मात्र, २०१९च्या विश्वचषकाच्या सराव सामन्यांना इंग्लंडमध्ये १५मे पासून सुरुवात होत आहे. त्याआधी पंधरा दिवस देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएल स्पर्धा संपवण्याचे कलम लोढा समितीच्या शिफारशींमध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा एप्रिलअखेरीसच संपवण्याची जबाबदारी बीसीसीआयवर आपोआप येऊन पडली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमपत्रिकेची राजकीय पक्षांप्रमाणेच बीसीसीआय आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी एप्रिलअखेरीस संपुष्टात येईल असा हंगामी कार्यक्रम आखून सज्ज ठेवला आहे. त्यानुसार फ्रँचायझींच्या वाट्याला येणाऱ्या काही स्वगृही व परगृही सामन्यांच्या संख्येवर गदा येण्याची शक्यता आहे. 

 

निवडणूक आयोगाच्या निवडणुका ज्या राज्यांमध्ये असतील त्या वेळी अन्य राज्यातील केंद्रांवर सामने घ्यायचे आणि निवडणुका झाल्या की त्या राज्यातील सामने, तारखांचा बदल करून घ्यायचे, अशी सध्याची योजना आहे. मात्र, बीसीसीआयच्या या कार्यपद्धतीला केंद्र सरकार किंवा निवडणूक आयोगाने अनुकूलता दर्शवली नाही तर सामन्यांच्या संख्येत काटछाट करावी लागेल. 

 

विश्वचषक व सुरक्षेमुळे अडचण 
सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकार निश्चितच तडजोड करणार नाही. तसेच यापूर्वीच्या दोन निवडणुकांप्रमाणे या वेळी परिस्थिती नाही. त्या वेळी स्पर्धेचे सामने घेण्यासाठी संपूर्ण मे महिन्याचा कालावधी उपलब्ध होता. या वेळी विश्वचषक स्पर्धेमुळे ती संधीही साधता येणार नाही. मात्र, बीसीसीआयने आयपीएल सामन्यांच्या सर्व केंद्रांना मैदाने व खेळपट्ट्या तयार ठेवण्याचे आदेश दिल्याचे समजते. 


 

बातम्या आणखी आहेत...