भुसावळ येथे काम करत असताना निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू

प्रतिनिधी

Apr 24,2019 02:15:00 PM IST


यावल - निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्याला चक्कर येऊन पडल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पंकज गोपाळ चोपडे वय 35 रा. न्हावी ता. यावल असे या कर्मचाऱ्याचे नाव असून सोमवारी भुसावळ येथे तहसिल कार्यालयात त्यांना भुरळ आली होती. ते जमिनीवर कोसळला होते तर मंगळवारी मध्यरात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे


न्हावी ता. यावल येथील रहिवासी पंकज गोपाळ चोपडे वय 35 हे जे.टि. महाजन पॉलीटेक्निक महाविद्यालयात लिपिक पदावर कामाला होते. त्यांची भुसावळ येथे लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली होती. सोमवारी मतदान केंद्रावर जाण्यासाठी ते भुसावळ येथे तहसील कार्यालयात गेले होते. सकाळी आठ वाजता पोहोचल्यानंतर काही वेळ साहित्य वितरणाचे काम केल्यावर त्यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना तत्काळ प्रथम जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तेथून नंतर एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना यांचे दुःखद निधन झाले. बुधवारी यावल येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉ. फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या अशा या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

X
COMMENT