फ्लॅशबॅक / आडसकरांचा ‘हाबाडा’ राज्यभर गाजला; झुबकेदार मिशांवर भाळली रशियन तरुणी

सन १९७८ मध्ये केजचे अामदार बाबुराव आडसकर व आष्टीचे आमदार लक्ष्मणराव जाधव यांनी इंदिरा गांधींची दिल्ली येथे भेट घेतली. सन १९७८ मध्ये केजचे अामदार बाबुराव आडसकर व आष्टीचे आमदार लक्ष्मणराव जाधव यांनी इंदिरा गांधींची दिल्ली येथे भेट घेतली.

 १९७२ च्या निवडणुकीत बापूसाहेब काळदाते यांचा पराभव करणाऱ्या बाबूराव आडसकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विधानसभेतही आकर्षण

Sep 23,2019 05:07:28 PM IST

अनंत वैद्य

बीड - निवडणुका म्हटलं आराेपांच्या फैरी झडतात. भाषणात वेगवेगळे शब्दप्रयाेग करुन विराेधकांना ‘शब्दबंबाळ’ केले जाते. यापैकी एक शब्द ‘हाबाडा’ हा महाराष्ट्राच्या राजकारणात परिचित आहे. हा रांगडा शब्द बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाबूराव आडसकर यांची देण आहे. आजही विराेधकांना चीतपट करण्यासाठी बीडसह राज्याच्या राजकारणात ‘हाबाडा’चा वापर होतो.


१९७२ चा काळ होता. राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता होती. मात्र बीड जिल्ह्यात कम्युनिस्टांचे प्राबल्य. सुंदरराव सोळंके, सयाजीराव पंडित, श्रीपतराव कदम, केशरबाई क्षीरसागर, बाबूराव आडसकर या नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवून कम्युनिस्टांना शह दिला. केज मतदारसंघात १९७२ च्या दुष्काळात राबराब राबून आडसकर यांनी जनतेशी नाळ अधिक घट्ट केली हाेती. सन १९६४ मध्ये पंचायत समिती सभापतिपदावरून केलेल्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी. याच बळावर काँग्रेसकडून त्यांना १९७२ मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली, परंतु समोर आव्हान होते ते ज्येष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या बलाढ्य नेतृत्वाचे. फर्डे वक्ते असलेल्या बाबूरावांनी गल्ली, पारावरील बैठकांपासून ते हजारोंच्या सभांतून प्रचाराचा धुराळा उडवून दिला. अस्सल गावरान शब्दांचा मारा करत हाेणारी त्यांची भाषणे खूप गाजायची.


‘औंदा हाबाडा देणारच, विरोधकांचा टांगा पलटी करायचाच, मतदारसंघाचं टिकूर माझ्या हाती द्या मंग दाखवतो विकास’असे विराेधकांना धडकी भरवणारे भाषण बाबूराव करायचे तेव्हा मतदारांकडून त्याला उत्स्फूर्त दाद मिळायची. या निवडणुकीत मतदारांनी बाबूरावांना विजयी केले. ते जेव्हा विधानसभेत गेले तेव्हा काळदातेंना पराभूत करणाऱ्या या रांगड्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्यासाठी पत्रकार व आमदारांचीही गर्दी व्हायची. झुबकेदार मिशा, डोईवर टोपी, पांढरा शुभ्र नेहरू अन् धोतर अशी वेशभूषा असलेल्या बाबूरावांना पत्रकारांनी गराडा घातला. ‘काळदाते कसे पराभूत झाले ?’ असा प्रश्न केला, त्यावर क्षणाचाही उसंत न घेता बाबूरावांच्या तोंडून दोनच शब्द बाहेर पडले, ‘दिला हाबाडा’. इथूनच हाबाडा शब्द राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध झाला.

अन‌् तिने घेतला चक्क बाबूरावांचा मुका
मुख्यमंत्री शरद पवारांनी रशियाच्या अभ्यास दौऱ्यासाठी आमदारांच्या शिष्टमंडळात आडसकराना निवडले. ‘आपल्याला कशाला बाबा रशिया, बिशिया’ असे म्हणत आडसकरांनी आधी नकार दिला. मात्र पवारांच्या आग्रहावरून ते गेले. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी स्वत: पवारांनी रशियाचे नेते स्टॅलिन यांच्याप्रमाणे बुश शर्ट बनवून घेतला होता. धोतर टोपी, झुबकेदार मिशा अशा भारदस्त वेशातील बाबूरावांना पाहून रशियातील लोक चकित होत. मॉस्को विद्यापीठात तर एका तरुणीने आडसकरांच्या मिशांवर भाळून ‘स्टॅलिन, स्टॅलिन’ म्हणत त्यांचा मुका घेतला. शरद पवार यांनी एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला हाेता.

X
सन १९७८ मध्ये केजचे अामदार बाबुराव आडसकर व आष्टीचे आमदार लक्ष्मणराव जाधव यांनी इंदिरा गांधींची दिल्ली येथे भेट घेतली.सन १९७८ मध्ये केजचे अामदार बाबुराव आडसकर व आष्टीचे आमदार लक्ष्मणराव जाधव यांनी इंदिरा गांधींची दिल्ली येथे भेट घेतली.