आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना संधी, केजरींची चर्चा अन् काँग्रेसचा कंटाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झपटना, पलटना, पलट कर झपटना, लहू गर्म रखने का है एक बहाना.. प्रसिद्ध हिंदी कवी इक्बाल यांच्या काव्यपंक्तींद्वारे निवडणुकीच्या कसरतीचे वर्णन करता येईल. पक्षांमध्ये बंडखोरीचे पेव माजले आहे. वक्तव्यही तोफगोळ्यांसारखे दिले जात आहेत. वाद-विवादही शिगेला पोहोचले आहेत. निवडणुकीचा माहोल गरम करण्याचा हाच खरा देशी फॉर्म्युला आहे.

चार मैलांवर पाणी बदलते, आठ मैलांवर वाणी बदलते, पण राजकारण प्रत्येक मैलावर! एवढ्या राज्यांतील प्रवासावरून हे स्पष्ट होते. निवडणूक एक्स्प्रेसचा प्रवास देशाच्या पश्चिमेकडून सुरू झाला. तेव्हा मोदींची वाराणसीतून उमेदवारी जाहीर होण्याची चर्चा होती. प्रवासी म्हणाले, मोदी गुजरातेतून निवडणूक लढले नाहीत, तर राज्याचा अपमान होईल. नंतर झालेही असेच. वाराणसीसह वडोदर्‍यातही उभे राहिले. पंजाब - हरियाणातही स्थानिक पक्ष बळकट आहेत. मात्र कौल मोदींच्या बाजूनेच दिसतो. तेथील लोक राज्यात स्थानिक पक्षाला पाठिंबा देतात, मात्र त्यांना पंतप्रधानपदी मोदीच हवेत. स्वातंत्र्यानंतर फक्त काँग्रेसलाच मत देणार्‍या 80 वर्षांच्या पंजाबमधील गोवर्धन सिंहांचे हे मत आहे. उत्तर प्रदेशचा निराळाच तोरा आहे. येथून लढणारा प्रत्येक पक्ष मजबूत आहे. यूपी-बिहारचे लोक मोठी आश्वासने देण्यात तरबेज आहेत. मात्र, मत कुणाला देतील, हे निकालानंतरच कळेल.

गंगेच्या दुसर्‍या किनार्‍यावर यंदा राजकीय वातावरणात बदल झाला आहे. बडे स्टार प्रचारक प्रथमच ईशान्येकडील राज्यांकडे वळले. रेड कॉरिडॉरमध्ये गल्ली-गल्लीत वेगळे राजकारण आहे. दक्षिणेकडील वातावरण उत्तरेच्या एकदम विरुद्ध आहे. उर्वरित देशाचे राजकीय वातावरण पूर्णपणे मनमानीपणाचे आहे. मात्र देशात मोदींची लाट, केजरीवालांचीही चर्चा आणि काँग्रेसला दूषणे दिली जात आहे, हे मात्र नक्की. असे असले तरीही उत्तर आणि दक्षिणेत खूप फरक आहे. केजरीवालांना देशातील सर्व लोक आजही सर्वात प्रामाणिक नेता मानतात. मात्र दिल्लीची सत्ता सोडल्यानंतर कमकुवत आणि कच्चे असल्याचेही बोलले जात आहे. राहुल गांधींचा विषय कधी तरी निघतो. एकूणच काँग्रेस सरकारला लोक वैतागले आणि विटले आहेत. मोदींच्या गुजरातेतील विकासाची स्तुती केली होत आहे. लोक गोध्रा हत्याकांड विसरले नाहीत, पण त्यांना फक्त एक संधी देऊ इच्छितात. या सगळ्यांना डावलून नकाराधिकार वापरण्याची इच्छा असलेलेही भरपूर आहेत.

रेल्वेचा प्रवासही निवडणुकीसारखाच खडतर
सकाळी दहा वाजता तत्काळ कोटा खुला दिसताच अ‍ॅव्हेलेबल दिसणे. आयआरसीटीसीच्या साइटवर कनेक्शन एररविना दोन किंवा तीन प्रयत्नांतच तिकीट बुक होणे, स्टेशनमध्ये आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणे, त्यावर स्पष्ट अक्षरात कंपार्टमेंटचे नाव दिसणे, काही क्षणात जागा सापडणे... अहाहा.. स्वर्गसुखाचा आनंद.. विशेषत: महिनाभर प्रवास केल्यानंतर हे सर्व मिळण्याचा आनंद औरच. ट्रेनच्या बोगीवर आपले नाव निकाल पाहिल्यासारखेच शोधावे लागते. कारण ट्रेनच्या तिकिटाचा क्रमांक आपल्याला एक्झिट पोलच आकड्यांहून किचकट भासत असतात. आपले तिकीट कन्फर्म असल्यावर विश्वासच बसत नाही. कधी कधी तर दोन ट्रेन, दोन श्रेणीचे तिकीट काढतो.. एखादा तरी मिळेल या आशेने..