आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election Of Assembly But Discussion Of Kashmir And Nationalism

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक विधानसभेची, चर्चा काश्मीर अन‌् राष्ट्रवादाची

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर महाराष्ट्रासाठी एखादी महत्त्वाची घाेषणा करतील अशा आशेने राज्यातील संपूर्ण जनतेचे या सभेकडे लक्ष लागले हाेते. यापूर्वीही ७ सप्टेंबर राेजी मुंबई व आैरंगाबाद दाैऱ्यावर आलेल्या माेदींनी एकही महत्त्वाची घाेषणा केली नव्हती. त्यामुळे किमान नाशकात माेदी राज्यातील गुंतवणूक, वाढलेला बेरोजगारीचा दर, सरसकट कर्जमुक्ती आदींपैकी एक निर्णय घेतील अशी अपेक्षा हाेती. मात्र माेदींनी काश्मीर व देशाच्या सुरक्षेबाबतच भाषणबाजी करून महाराष्ट्राची निराशा केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात राज्यातील सर्व प्रश्नच संपले असल्याचा दावा केला.

उत्पादक राज्य या नात्याने देशातील मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील उद्योगांना बसत असल्याने व्यापार आणि उद्योग उदीम चिंतेत आहे. पुणे, आैरंगाबादेत आॅटाेमाेबाइल कंपन्यांस मंदीचे फटके बसत आहेत, तर नाशिकमधील अनेक उद्याेगातील उत्पादनही बंद पडले आहे. राज्यातील उद्योजकांनी त्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. नाशिकमधील उद्योजक संघटनांनीही पत्रकार परिषद घेऊन आर्थिक मंदी व सरकारी धोरणावर नाराजी व्यक्त केली होती. कर्जमाफी, पीक विमा या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी राज्यातील निवडणुकीचा सूर निश्चित करण्याच्या उद्देशाने भाजपच्या वतीने काहीतरी महत्त्वाची घोषणा करतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. त्यादृष्टीने नाशिकच नाही तर राज्यातील जनतेचे लक्ष नाशिकच्या या सांगता सभेकडे लागले होते. ओझरच्या एचएएलला कामाचा तुटवडा भासू देणार नाही, अशी घोषणा त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पिंपळगाव बसवंतमध्ये झालेल्या सभेत केली होती. परंतु या प्रश्नांना स्पर्श करणारी कोणतीच घोषणा त्यांनी केली नाही. फक्त लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून चर्चेत असलेले डिफेन्स इनोव्हेशन हब आणि राज्यातील चार ड्राय पोर्टपैकी एक पोर्ट या जुन्याच घोषणांचा पुनरुच्चार केला.
 

राजकीय पंडितांना आवाहन
काही राजकीय पंडित तत्कालीन घटनांना महत्त्व देऊन काळाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे सांगतानाच वेगाने पुढे जाण्याचे व देशाला पुढे नेण्याचे सामर्थ असूनही महाराष्ट्र राजकीय स्थैर्यामुळे आजवर अपेक्षित वेगाने पुढे जाऊ शकले नाही, असे सांगत माेदींनी अप्रत्यक्षपणे यापूर्वीच्या आघाडी सरकारकडे अंगुलीनिर्देश केला. महाराष्ट्राचा लहान भाऊ असलेले गुजरात भाजपमुळेच पुढे जाऊ शकले, याचा दाखला देत राज्यातील गरीब शेतकरी आणि मजूर राजकीय अस्थैर्याचे शिकार झाल्याचे ते म्हणाले.

शिवरायांच्या वंशजांचे माझ्यावर छत्र : मोदी
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भाेसले यांनी माेदींना शाही पगडी घालून स्वागत केले. माेदींनी त्यांचा हात हातात घेत अभिवादन केले. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्यासोबत असल्याचे भाजपने म्हटले. मोदींनी उदयनराजेंचा उल्लेख करताना ‘खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुबीयांनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवले आहे,’ असे गौरवाद्गार काढले.
 

मोदींना घातलेली पगडी रात्रीतून केली तयार
राकेश बनकर | पिंपळगाव बसवंत येथील योगेश डिंगोरेला बुधवारी रात्री ११ वाजता उदयनराजेंचे मेव्हणे रत्नशील राजे  स्वतः येऊन ऑर्डर देऊन गेले. योगेशने ही पगडी साडेतीन तासांत बनवून रात्री अडीच वाजता दिली. ती रत्नशील राजे यांना खूपच आवडली. यासाठी योगेश यांना २१०० रुपयांचे मानधन दिले. या पगडीचा उल्लेख मोदी यांनी सभेत केला. 
 

अमित शहा रविवारी मुंबईत, जागावाटपावर चर्चा
मुंबई | भाजपाध्यक्ष अमित शहा रविवारी ‘३७० कलम’वर व्याख्यानासाठी मुंबईत येत आहेत. यानंतर ते शिवसेना नेत्यांशी जागा वाटपाबाबतही चर्चा करू शकतात. लोकसभेच्या वेळी युतीची चर्चा उद्धव ठाकरे, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली होती. आता अंतिम चर्चाही या तिघांतच हाेईल. 
 
 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser