आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Of Memories : I Became An MP In Seven Rupees, Now Whom Should Tell... Who Will Believe?

आठवणीतली निवडणूक : सात रुपयांत खासदार झालो, आता कुणाला सांगू.. कोण विश्वास ठेवणारॽ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांनी वयाची ९३ वर्षे पूर्ण केली आहेत. दोन वेळा खासदार राहिलेले असतानाही ते भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार येथेच वास्तव्यास आहेत. ते जसे आपल्या साध्या राहणीमानासाठी परिचित आहेत तसेच परखड वक्तव्यासाठीही प्रसिद्ध आहेत. १९७७ ला जनता पक्षाची उमेदवारी घेऊन ते लोकसभेच्या मैदानात उतरले आणि खासदार झाले. त्या निवडणुकीत अवघ्या सात रुपयांत आपण खासदार झालो असे त्यांनी सांगितले. त्या 

निवडणुकीसंदर्भातील आठवणी त्यांच्याच शब्दात..
१९७७ ला अनेकांना आणीबाणीची झळ पोहचली. देशभरात इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. आशा परिस्थितीत जनता पार्टीने मला उमेदवारी दिली.माझ्या खिशात अवघे सात रुपये होते. परंतू तेव्हा लोक प्रामाणिक होते. प्रचारावर अशाप्रकारे लाखो रुपये खर्च करावे लागत नसत. त्यामुळे अवघ्या सात रुपयात मी खासदार झालो. आज मी कुणालाही हे सांगत नाही, आणि सांगितले तर त्यावर कुणी विश्वास ठेवेल का. परंतु ते सत्य आहे. कारण तेव्हा निवडणुका आतासारख्या खर्चिक नव्हत्या. १९६७ ला विधानसभेच्या निवडणुकीत मी माझे ६० रुपये खर्च झाले तेव्हा अवघ्या दीड हजार मतांनी माझा पराभव झाला. १९७२ ला पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली मात्र तेव्हाही पराभूत झालो. परंतु १९७७ ला खिशात अवघे सात रुपये असताना जनता पक्षाने उमेदवारी दिली. मी प्रचार सुरू केला. मतदारसंघातील एखाद्या गावात जायचे तेथील दोन चांगल्या माणसांकडे निरोप द्यायचा. ते माणसे गावात आपल्या उमेदवारीसंदर्भात माहिती द्यायची आणि नंतर मतदानही करायचे. लोक कोणत्याही अपेक्षेशिवाय दिलेला शब्द पाळायचे. 'जान जाय, पर वचन न जाय', या तत्वाने लोक वागायचे. १९७७ ला मी प्रचार सुरू केल्यानंतर गावागावात जाऊन भेटी घ्यायचो. कधी बैलगाडी तर कधी पायी असे रात्रंदिवस आम्ही फिरायचो. सोबतचे लोकही स्वत: घरून भाकरी घेऊन यायचे. आणीबाणीमुळे भरडल्या गेल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.

'लाटणेवाली बाईं'ची सभा
माझा प्रचार सुरू असतानाच काहींनी तत्कालीन समाजसेविका मृणाल गोरे यांची सभा घ्यायची ठरवले. 'पाणीवाली बाई, लाटणेवाली बाई' म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यामुळे जालन्याच्या मामा चौकात झालेल्या सभेला जवळपास २५ हजार लोक हजर होते. 'मुझे व्होट दो और नोट भी दो' असे आवाहन या सभेत मी केले. त्याला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. आमचे सहकारी सभेत झोळ्या घेऊन फिरत होते. त्यात अनेकांनी एक रुपया, दोन रुपये टाकले आणि सभेचा खर्च वसूल झाला. काही दिवसातच मतमोजणी झाली. देशभरात काँग्रेसची पिछेहाट झाली. इंदिरा गांधी, संजय गांधी असे दिग्गज पराभूत झाले. मी मोठ्या मताधिक्याने विजयी झालो. आज निवडणूक लढायची म्हटले तरी लाखो रुपये खर्च करावे लागतात. जो जास्त पैसे खर्च करतो तो निवडून येतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. तळमळीने काम करणारे कार्यकर्ते जर पुढे गेले तरच ते विकासकामे करू शकतील. अन्यथा पैसे खर्च करणारा पुन्हा ते वसूल करण्यासाठीच काम करतो.

आता मतदार हुशार झाले
'खिशात नोट आणि घशात घोट' अशी तयारी असेल तर निवडणूक लढवावी, असे सध्याचे चित्र आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. एक दिवस लोक उमेदवाराकडून पैसे घेतील मात्र मतदान चांगल्या उमेदवारालाच करतील. कारण उमेदवाराचे चित्र चांगले असले दिसत असले तरी लोक चरित्र पाहूनच मतदान करतील. शेवटी 'मॉरल अथॉरिटी' ही कोणत्याही अथॉरिटीपेक्षा मोठी आहे, याची समज लोकांमध्ये येत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...