आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळनेगर ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, थेट लोकांमधून होणार सरपंचाची निवडणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर (धुळे)- जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत पिंपळनेरचा थेट सरपंचपदासह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 सदस्यसंख्या असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीत ६ वॉर्डांचा समावेश आहे. जिल्ह्यात आर्थिकदृष्‍ट्या मजबुत ग्रामपंचायत म्‍हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. 

 

निवडणूकीची घोषणा होताच प्रमुख राजकीय पक्षांच्या आजी-माजी सदस्यांसोबत अनेक तरुण उमेदवारांची रेलचेल सुरू आहे. जिल्ह्य़ातील सवाँत मोठी लोकसंख्या व आर्थिक विकासाबरोबर उत्पन्न गटात प्रथम क्रमांक असलेली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असावी या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अनेक समस्यांतून पिंपळनेरकर आजही मुक्त झालेले नाही.


यंदाच्या निवडणुकीत वॉर्डरचनेत फेरबदल झाले असल्याने अनेकांना आनंद तर काहींना अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणुक पिंपळनेर शहरात प्रथमच होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.


पिंपळनेर ग्रामपंचायतीची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक प्रभागांमध्ये बदल झाल्याने उमेदवारांसह मतदारांची तारांबळ उडणार आहे. पिंपळनेर ग्रामपंचायतीवर अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी भाजपा सर्व शक्ती पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे स्पष्ट चित्र दिसत आहे तर काँग्रेसला आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

 

ग्रामपंचायतीकडून झालेली विकास कामे:-

सद्यस्थितीत पिंपळनेर पंचायतीकडून अनेक विकास कामे झाली आहेत. त्यात भुमिगत गटारी,जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्ते, विविध प्रभागातील रस्ते,पथदिवे,घरकुल योजनेअंतर्गत घरे,वैयक्तिक शौचालय अशी कामे अलीकडच्या काळात झाली आहेत.

 

अतिक्रमणाबाबत नाराजी कायम:-

पिंपळनेर शहराचा विकास झपाट्याने होत असताना वस्त्यांचा विस्तारही वाढत आहे. अनेक वादांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने पायी चालणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे शहरातील ज्या ज्या भागात अतिक्रमण वाढले आहे, ते काढण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना असणार आहे.


या समस्या अद्यापही आहेत कायम:-

नव्याने उदयास आलेल्या वस्तीत अद्याप पक्के रस्ते नाहीत, विद्युत पोल,पथदिवे भुयारी गटारी, पाणीपुरवठ्याची पाईपलाईन नाही, ओपन प्लेस वर सर्वजनिक उपयोगासाठी गार्डन अथवा इतर बाबींचा विकास होणे अपेक्षित आहे. साथीच्या आजारांच्या कालावधीत प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. नवीन बांधकामावेळी होणाऱ्या अतिक्रमणाबाबत प्रतिबंध करणे आवश्यक आहे. शहरात मोबाईल टॉवरची संख्या जास्त असल्याने नागरिकांना टॉवरच्या रेडिएशनमुळे  मानसिक आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शहरात नवीन टॉवरची परवानगी देऊ नये व संभाव्य धोका टाळावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


आतापर्यंत केवळ आश्वासन:-

शहरातील मोठ्या चौकात एलईडी दिवे बसवले असून असूनही पुरेशा प्रमाणात प्रकाश नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. पूर्व भागात आतापर्यंत अनेकांनी 'रस्ता विकास' या मुद्यावर निवडणूक लढविली. परंतु अद्यापही पक्क्या रस्त्यांची निर्मिती झाली नाही. पावसाळ्यात या कॉलन्यांमध्ये पायी चालणेही कठीण झाले आहे. शहरातील नवीन भाजी मार्केटमध्ये मोठी वर्दळ असते, परंतु तेथेही पक्के रस्ते नसल्याने मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागतो.

 

असे असेल आव्हान:-

शहरात शौचालय, घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेले घरे यासंदर्भात नागरिकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अनेक वॉर्डात कचरा कुंडी नसल्याने कचऱ्याचे सुयोग्य नियोजन करता येत नाही. म्हणून ज्या वार्डात कचरा कुंड्या नाहीत त्या ठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात यावी, जेणेकरून वार्ड स्वच्छ राहण्यास मदत होईल व संभाव्य आजार टाळता येतील. त्याच प्रमाणे काही भागात भूमिगत गटारी नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असून त्या गटारी बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रमुख मार्गांवर मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. वाहनांची संख्या दुकानाबाहेर जास्त प्रमाणात असते त्यामुळे वाहतुकीची कोंडीही निर्माण होते. त्यामुळे अतिक्रमण असलेल्या ठिकाणी अतिक्रमण काढणे, अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या आव्हानांची मालिका येणाऱ्या सत्ताधार्‍यांसमोर असणार आहे तर दुसरीकडे प्रत्येक प्रश्नांचा जाब उमेदवारांना विचारला जाईल अशी भूमिका मतदारांनी घेतली आहे.

 

प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर:-
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सदस्यांसह, माजी सदस्य, तरुण उमेदवारांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रचारासाठी प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच सर्व गोष्टींचा विचार करता मतदार आपला कौल कोणाला देतात याचे चित्र २९ सप्टेंबर रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे.


अशी आहे प्रभाग रचना:-


प्रभाग क्रमांक १:- ईदगाव पाडा,जे टी पॉईंट,बोरबन भिलाटी,गोपाळनगर,नाना चौक,कन्या शाळेसमोरील भाग, न्हावी हुडा.


प्रभाग क्रमांक 2:-  खडक्या पाडा,पैल्हाड भिलाटी, पाटील वाडा,न्हावी गल्ली,शिवाजी व्यायाम शाळा,जनता बँक कन्या शाळेपर्यंत.


प्रभाग क्रमांक ३:- कुंभार गल्ली,माळी गल्ली,हरिओम नगर, टेकपाडा,मानव केंद्र,कोळीवाडा,गांधी चौक,अप्पर तहसील कार्यालय,बाजारपेठ,दोस्ती पान सेंटर,अप्सरा गल्ली,भोई गल्ली,नवीन भाजीपाला मार्केट, खोल गल्लीपर्यंत.

 

प्रभाग क्रमांक ४:- नवापूर रोड,रामनगर, लोणेश्वरी भिलाटी, मदनीनगर,गूड शेफर्ड स्कूल ते फॉरेस्ट कार्यालयापर्यंत.


प्रभाग क्रमांक ५:- टेंभा रोड,इंदिरानगर पूर्व भाग,रोशन नगर, माधवनगर,संभाव्य नवीन वसाहत ते संजय नगर, हनुमान मंदिर पर्यंत.


प्रभाग क्रमांक ६:- मनोज बूट हाऊस ते गुजरी पूर्व भाग,पंचमुखी कॉर्नर,सटाणा रोड पूर्व भाग, सगररवंश नगरपर्यंत,मोरया नगर,पानथळ भिलाटी,दस नंबरी,बस स्टॅन्ड पर्यंत,राजे पार्क,अलंकापुरी नगर पर्यंत.

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...