हवा उत्तर महाराष्ट्राची / हवा उत्तर महाराष्ट्राची : अनिश्चिततेच्या माहोलात सत्ताधाऱ्यांची वाट बिकट

Feb 05,2019 09:34:00 AM IST

नाशिक. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्राचा राजकीय बाज अन्य विभागांपेक्षा काहीसा वेगळा अाहे. त्याचे कारण म्हणजे येथील सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक रचना. नाशिक आणि जळगावसारखी प्रगतशील शहरे एकीकडे, तर दुसरीकडे अर्धाअधिक भाग दुर्गम, आदिवासीबहुल असल्याने इथे मतदारांच्या मानसिकतेपासून नेतृत्वाच्या कार्यपद्धतीपर्यंत कुठेच एकजिनसीपणा दिसत नाही. साहजिकच सहसा कुणा एका पक्षाची वा नेत्याची पाठराखण येथे होत नाही. परंतु २०१४ ची लाेकसभा निवडणूक मात्र याला अपवाद ठरली आणि या भागातल्या सर्व सहाही लाेकसभा मतदारसंघात तत्कालीन भाजप-शिवसेना युतीने बाजी मारत काॅंग्रेस- राष्ट्रवादी अाघाडीला धूळ चारली. त्यातही एकट्या नाशिकमध्ये शिवसेना जिंकली तर उर्वरित पाचही जागांवर माेदी लाटेत भाजपचे कमळ फुलले. पण अागामी लाेकसभा निवडणुकीत मात्र माेदी लाटही नाही अाणि भाजपला गतवेळेप्रमाणे येथे मैदान मोकळे मिळणार नाही. कारण, अजून भाजप-शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह असल्याने उमेदवारही संभ्रमात अाहेत. शिवाय छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे हे दोन ‘हेवीवेट’ नेते सत्तेपासून दुरावले असून त्यांच्या प्रभावाची पोकळी अद्याप भरून निघालेली नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय माहोल सध्या तरी तसा अनिश्चिततेनेच भारलेला आहे.


पुढे वाचा सविस्तर...

नाशिक जिल्ह्यात माजी मंत्री छगन भुजबळ, तर जळगाव जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भूमिका ठरणार निर्णायक नाशिक : यंदाही रंगणार गाेडसे विरुद्ध भुजबळ सामना गेल्या वेळी छगन भुजबळांना चितपट करणारे शिवसेनेचे हेमंत गोडसे ‘जायंट किलर’; ठरले होते. ऐनवेळी मनसेतून आलेल्या गोडसे यांना मोदी लाटेचा जसा लाभ झाला तसा त्या वेळी स्थानिक पातळीवरील ‘भुजबळ नको’; हा परवलीचा शब्दही त्यांच्या कामी आला. अाता मात्र युतीची अजून शाश्वती नाही अन् झाली तरी गोडसे यांना दुहेरी सहानुभूती मिळणार नाही. स्वत:च्या पक्षातच एकजिनसीपणा ते ठेऊ शकलेले नाहीत. कुणीतरी एक भुजबळ रिंगणात नक्की असेल असे छगन भुजबळांनीच जाहीर केले असल्याने यंदा पुन्हा भुजबळ विरुद्ध गोडसे असा सामना रंगेल. समीर भुजबळ तयारीत अाहेत, त्यांच्या पत्नी शेफाली यांचेही नाव चर्चेत अाहे. माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या अमृता व माजी आमदार माणिकराव कोकाटे हे योग्य संधीच्या शोधात आहेत.दिंडाेरी : हरिश्चंद्र चव्हाण- धनराज महालेंत लढत शक्य या मतदारसंघात भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी हॅट््ट्रिक साधली अाहे. त्यांचा संपर्कही दांडगा अाहे. अन्य पक्षांतील नेतेमंडळींशी मैत्रीचे नाते आहे. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे नुकतेच राष्ट्रवादीत गेले. ते चव्हाणांना अाव्हान देऊ शकतात. भारती पवार यांचे नावही राष्ट्रवादीत एका गटाने लावून धरले आहे. मात्र, स्वत: छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज यांचे विधानसभा मतदारसंघ दिंडोरीत येतात, त्यामुळे भुजबळांची ताकद महालेंच्या पाठीशी राहू शकेल. माकपचे आमदार जीवा पांडू गावित यांचा प्रभाव असलेला सुरगाणा, पेठचा परिसरही याच मतदारसंघात येताे. त्यामुळे गावित किंवा या पक्षाचा अन्य उमेदवारही लढतीत असण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण इथे अधिक परिणामकारक ठरेल.धुळे : गाेटेंशी ‘वैर’; राज्यमंत्री सुभाष भामरेंना अडचणीचे या मतदारसंघात ३ तालुके धुळे तर तीन नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे स्थानिक अस्मितेचा मुद्दा महत्त्वाचा असतो. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (भाजप) हे येथील खासदार अाहेत. ते धुळ्याचे असल्याने त्यांच्या विरोधात नाशिकचा उमेदवार दिल्यास मतांच्या ध्रुवीकरणाचे समीकरण प्रभावी ठरेल. मात्र सध्या काँग्रेसकडून धुळ्याचेच माजी मंत्री रोहिदास पाटील अथवा त्यांच्या पुत्राचे नाव चर्चेत अाहे. मात्र मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची काँग्रेसने नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून भविष्यातील चुणूक दाखवली. हिरे घराण्याच्या पुढच्या पिढीची देखील चाचपणी करत अाहे. आ. अनिल गोटे आणि भामरे यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य असल्याने भामरे ‘डॅमेज कंट्रोल’; कसे करतात त्यावर सारे अवलंबून असेल.नंदुरबार : अनुभवी काँग्रेसचे गावितांसमाेर कडवे अाव्हान या मतदारसंघात सहापैकी साक्री आणि शिरपूर हे दोन तालुके धुळे जिल्ह्यातील असून तेथील मतविभाजनाचा निकालावर प्रभाव असताे. भाजपच्या खासदार हिना गावितांचा जनसंपर्क चांगला आहे. शिवाय वडील विजयकुमार गावितांचा अनुभव आणि सक्षम यंत्रणा भाजपची बलस्थाने अाहेत. मात्र, भाजपची जुनी मंडळी गावितांच्या कार्यपद्धतीवर फारशी खुश नाहीत. परंपरेने काँग्रेसची पाठराखण केलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी विजय मिळवताना गावितांचा कस लागला होता. या वेळी काँग्रेसकडून के. सी. पाडवी यांचे नाव चर्चेत अाहे. ते धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले आहेत. चंद्रकांत रघुवंशीसारख्या मातब्बरांशी त्यांचे चांगले संबंध अाहेत. त्यामुळे गावितांसमोर गतवेळच्या तुलनेत पाडवींचे तगडे आव्हान असेल.जळगाव : भाजपसमाेर पक्षांतर्गत नाराजीचे अाव्हान भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगाव मतदारसंघात विरोधकांकडून अद्यापही ‘तयार’; उमेदवाराचा शोध सुरू आहे. एकेकाळी हुकमी एक्का असणाऱ्या सुरेश जैनांचा प्रभाव आता ओसरला आहे. तसेच ठरावीक पॉकेटस् वगळता शिवसेनेचा हक्काचा मतदार नाही. जळगाव मतदारसंघात विद्यमान भाजप खासदार ए. टी. पाटील यांना ही स्थिती लाभदायक असली तरी पक्षांतर्गत नाराजीला त्यांना माेठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागेल. शिवाय, अपेक्षित कामे झाली नसल्याची तक्रार आणि संपर्काची कमतरता हेही त्यांच्यापुढचे आव्हान आहे. भाजपमधून आलेल्या अनिल भाईदास पाटील यांचे नाव राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारीसाठी आघाडीवर असून भाजपच्या बालेकिल्ल्यात लढताना त्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.रावेर : नाराज खडसेंचा फॅक्टरच ठरेल कळीचा मुद्दा रावेर मतदारसंघातले राजकारण खडसे या नावाभोवती फिरत असते. त्यामुळे आजवर भाजपला तशी इथे चिंता नसायची, परंतु यावेळची स्थिती काहीशी वेगळी आहे. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून पक्षावर नाराज असलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसेंनी अद्याप आपले पत्ते उघडले नसल्याने रक्षा खडसे पुन्हा भाजपकडून उमेदवारी करतील का, याबाबत साशंकता आहे. रक्षा उमेदवार नसतील तर माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्यावर भाजपची भिस्त असेल. काँग्रेसकडून माजी खासदार उल्हास पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. मात्र, तरीही यंदा सुद्धा रावेरमध्ये पुन्हा खडसे फॅक्टरच कळीचा असेल. एकूणच उत्तर महाराष्ट्रात गेल्यावेळेच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हानाचा अवघड डोंगर उभा ठाकला आहे, हे निश्चित.
X