आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरला एक दिवस : मराठवाड्यातील 155 उमेदवारांची धाकधूक वाढली, उद्या निकाल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या १५५ उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.  सर्वच मतमाेजणी केंद्रांवर २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या वेळी सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात असून येथील निकाल हाती येण्यासाठी शुक्रवारची पहाटच उजाडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.  या निवडणुकीत आठ मतदारसंघांतून तब्बल १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.  औरंगाबाद मतदारसंघासाठी चिकलठाण्यातील  सिपेट येथे मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


बीड - ८४ टेबलवर मतमोजणी
बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामामध्ये सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.  सहा विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच वेळी प्रत्येकी १४ टेबल म्हणजे ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी १६९  फेऱ्या होणार आहेत.  ३६ उमेदवार रिंगणात असल्याने ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटची मतमोजणी  करावी लागणार असल्याने बीडचा अंतीम निकाल जाहीर होण्यास पहाटच उजाडणार आहे. यंदा प्रथमच माेबाइलमध्ये सुविधा अॅपवर मतदारांना निकाल पाहता येणार आहे.  प्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जाणार असून यामध्ये मतदान कर्मचारी व सर्व्हिस व्होटर्स मतदान राहील. पाेस्टल मतपत्रिकांनंतर अर्ध्या तासाने ईव्हीएममधील मतमाेजणीस सुरुवात हाेणार आहे.


जालना - ८०० कर्मचाऱ्यांची उपस्थिती
जालना लोकसभा मतदारसंघाची २३ मे रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून सुरुवात होणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी ८४ टेबलवर होणार आहे. मत मोजणीसाठी ८०० अधिकारी, कर्मचारी राहणार आहेत. मतमोजणी केंद्राच्या बाहेर १०० मीटर परिसरात पादचारी विभाग निश्चित करण्यात आला आहे. मत मोजणीसाठी ९६ पर्यवेक्षक, सहायक मतमोजणी अधिकारी ९६, मायक्रो ऑब्जर्व्हर ९६, प्रत्येक विधानसभेसाठी एक अधिकारी राहणार आहे. सर्व टेबलावरील ईव्हीएमएची मतमोजणी पूर्ण झाल्यावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठया मोजून त्या ईव्हीएमशी जुळवल्या जातील. 


नांदेड : दुपारीच समजेल निकालाचा कल
नांदेड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू होईल. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान निकालाचा कल समजू शकेल. सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल. त्याच सोबत लोकसभा मतदार संघातील सहापैकी ५ विधानसभा मतदार संघाची मतमोजणीही सुरू करण्यात येईल. या मतदारसंघांत ११ हजार ४४२ पोस्टल मतपत्रिका पाठवण्यात आल्या. त्यापैकी  ७ हजार ८८१ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  सैनिकांसाठी १५०७ मतपत्रिका पाठवण्यात आल्या.  पैकी ९०० मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. पोस्टल मते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षातच मोजण्यात येतील. 


परभणी : ६ विधानसभा मतदारसंघ; १४ टेबल 
परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी १४ टेबलवरून केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी याप्रमाणे एकूण ३२८ मतमोजणी कर्मचारी कार्यरत राहतील. २४ अधिकारी व ४०० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.  कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल.  मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्यासह सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १२ अतिरिक्त अधिकारी, एक अतिरिक्त जिल्हाधिकारी तर चार उपजिल्हाधिकारी कार्यरत राहणार आहेत.


हिंगोली : १४ फेऱ्यांमध्ये होणार मतमाेजणी
हिंगाेली  लोकसभा निवडणुकीची मतमाेजणाी १४ फेऱ्यांमध्ये ८० टेबलवर होणार आहे.  येथील लिंबाळा मक्ता भागातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये ६ विधानसभांमधील  मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आल्या आहेत.  सकाळी ७ वाजता  निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदींच्या उपस्थितीत ही स्ट्राँगरूम उघडण्यात येणार आहे. उमरखेड, कळमनुरी, हिंगोली आणि किनवट या विधानसभा मतदारसंघात संघासाठी प्रत्येकी १४ टेबलवर तर हदगाव आणि वसमत विधानसभेतील मतमोजणी प्रत्येकी १२ टेबलवर होणार आहे.


लातूर : एका विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल 
लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बार्शी रस्त्यावरील शासकीय महिला निवासी तंत्र निकेतन येथे होणार आहे. मत मोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. लातूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदार संघाच्या मत मोजणीसाठी सुरुवातीला प्रारंभी सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेट मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतदानाची मोजणी होईल. प्रत्येक विधानसभानिहाय पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी होणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.    या वेळी चोख पोलिस बंदोबस्तही असेल. 


उस्मानाबाद : ३५० पोलिस कर्मचारी, ८५० निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती
उस्मानाबाद-लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शहरालगत शासकीय पाॅलिटेक्निकमध्ये होणार आहे. लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवारांनी मत अजमावले. त्यात राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध शिवसेनेचे ओमराजे यांच्यामध्ये थेट सामना झाला. वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सलगर यांनीही दोन्ही उमेदवारांना आव्हान दिले. मतमोजणीसाठी ८५० निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये पर्यवेक्षक, सहाय्यक तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षकांसह तीन पोलिस उपअधीक्षक, १५ पोलिस निरीक्षक, ४० उपनिरीक्षकांसह ४५० पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. ८० पोलिस कर्मचारी निवडणुकीच्या दिवसापासून स्ट्राँग रुममध्ये कार्यान्वित आहेत.२ हजार, १२७ मतदान केंद्रासाठी १४ टेबलवर १५५ फेऱ्या होणार आहेत. टपाली आणि सैन्य मतमोजणीसाठी ४ स्वतंत्र टेबल असतील.