आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडदामाजी काळे-गोरे...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. ही निवडणूक म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीमच असते. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला आगळे वेगळे महत्त्व असते. सर्व कार्यकर्ते, नेते, इच्छुक उमेदवार या आखाड्यात उतरण्यासाठी लंगोट बांधून तयार आहेत. सर्व पक्ष व्यायामशाळा आपले पठ्ठे कसे जिंकतील याचे डावपेच लढवण्यात मश्गुल आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतर, फोडाफोडी, पळवापळवी, बंडखोरी यांची लागण सर्वांनाच झाली आहे. ज्यांच्यातून विस्तव जात नव्हता त्यांचे संघटन वेगवेगळ्या गोंडस नावाखाली होत आहे. कोण कोणाशी घरोबा करील आणि कोणाशी काडीमोड घेईल, सांगता येत नाही. इथे इसापनीतील एक गोष्ट आठवते. ती अशी की एका नदीच्या पुरात वाहणाºया लाकडाच्या ओंडक्यावर चार प्राणी बसले होते. ते एकमेकांचे हाडवैरी होते. पाहणाºयाला ते गुण्यागोंविदाने बसल्याचे दिसत होते. पण पाण्यात बुडण्याच्या भीतीने ते बसले होते. तसा प्रकार येथे आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यापेक्षा निवडणूक जिंकणे हे सर्वांचे धेय आहे. आम आदमीला गृहीत धरून त्यांची वाटचाल सुरू आहे. ‘मला आला ताप देवा तू माझा बाप, माझा गेला ताप तर मी देवाचा बाप’ ही निवडणुकीपूर्वीची आणि नंतरची स्थिती आहे. राजकारणात कोणीही कोणाचे कायम मित्र किंवा शत्रू नसतात हे मतदार राजाला आता कळायला लागले आहे. जातपात, धर्म, घराणेशाही, नातेसंबंध या सर्वांच्या नावावर मतांचा जोगवा आता मागता येणार नाही. त्यामुळे गुणवत्तेवर निवडून येणाºया उमेदवारांची संख्या लक्षणीय असेल, अशी आशा करण्यास हरकत नाही. बघूया, घोडामैदान समोर आहे.