आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुंबईतील खार उपनगरात युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या इमारतीमध्ये अनधिकृत पद्धतीने भारतीय जनता पक्षासाठी इलेक्ट्रॉनिक कार्ड बनवणाऱ्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी छापा घालून सहा कोटी रुपयांची सामग्री जप्त केली आहे.
प्रचाराकरिता साहित्य तयार केले जात असताना त्याला निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आणि सैन्याचा वापर प्रचाराकरिता करू नये, असे निर्देश असतानाही तयार करण्यात येणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक कार्डमध्ये सर्जिकल स्ट्राइक, हवाई दलाचे विमान तसेच भारतीय लष्कराची प्रतिमा वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड केलेला संदेश असून कार्ड उघडताच तो ऐकू यावा, अशी सोय करण्यात आली आहे. या कार्डच्या किती प्रती छापल्या तेही कार्डवर नमूद करण्यात आलेले नसून प्रत्येक कार्डची किंमत ३०० रुपये असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. याबाबतची तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने हा छापा टाकला.
चौकीदार चोरच : सावंत
सचिन सावंत यांनी सांगितले, “मैं भी चौकीदार’ म्हणणारे चोर आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रचारसाहित्य निवडणूक आयोगाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून वापरण्याचा भाजपचा मानस असल्याचे स्पष्ट दिसत आहे. युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या मालकाने स्वतःची जागा या गैरकृत्याकरिता दिली होती आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे काम सुरू होते हे स्पष्ट आहे. या मालकाचे भाजपच्या नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे यासंदर्भामध्ये आचारसंहितेचा भंग तसेच पैशाचा गैरवापर व जनतेचा विश्वासघात करण्यात आलेला आहे. दरम्यान, राज्यातही भाजपच्या उमेदवारांकडून आचारसंहिता भंगाचे अनेक गुन्हे होत असल्याचेही सावंत त्यांनी या वेळी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.