उत्तर महाराष्ट्रात भाजपमध्ये सुंदोपसुंदी, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना संधी

केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे, समीर भुजबळ, रक्षा खडसे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष

दिव्य मराठी

Apr 23,2019 09:18:00 AM IST

भाजप जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराला मंत्र्यांसमोर बदडल्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीत उत्तर महाराष्ट्र चर्चेत आला, या निवडणुकीत भाजपला पक्षांतर्गत बंडखोरीने ग्रासले आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, नाशिक, दिंडोरी असे सहा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात येतात. जळगाव आणि रावेरमध्ये २३ एप्रिलला, तर नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक येथे २९ एप्रिलला मतदान आहे. गेल्या निवडणुकीत हे सर्व मतदारसंघ भाजप- शिवसेनेसोबत होते. या वेळी मात्र हे गड राखण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.


उमेद्वारांच्या चेहऱ्यांपेक्षाही त्यांच्या घरातील दिग्गज नेत्यांचीच परीक्षा पाहणारी ही निवडणूक आहे. नाशिकमधून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर, धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा मुलगा कुणाल, नंदुरबारमध्ये माजी मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हिना, रावेरमध्ये भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा असे प्रमुख उमेदवार आहेत. त्यामुळे या उमेदवारांपेक्षा माजी मंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


धुळे ः केंद्रीय मंत्र्यांना आव्हान
संरक्षण राज्यमंत्री डाॅ.सुभाष भामरे यांना काँग्रेसकडून धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार कृणाल पाटील यांनी आव्हान दिले आहे. भाजपचे धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्याने डॉ. भामरे यांची डोकेदुखी वाढली आहे. २०१४ मध्ये डाॅ.भामरे यांनी कााँग्रेसच्या अमरिष पटेल यांचा १ लाख ३० हजार मतांनी पराभव केला हाेता. या निवडणुकीत भामरे यांना एवढे मताधिक्य मिळणे अशक्य आहे.


नंदुरबार ः डॉ. हिना अडचणीत
२०१४ मध्ये भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला हाेता. सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम माणिकरावांच्या नावावर आहे. या वेळी डॉ. हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसकडून अॅड. के. सी. पाडवी रिंगणात आहेत. अॅड. पाडवी सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि ग्रामीण भागातील त्यांचा संपर्क तगडा आहे. भाजपमधील सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली आहे, नटावदकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले वजनदार नेते आहेत. त्यांच्या बंडखोरीने कांग्रेसच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत.


जळगाव ः राष्ट्रवादीला संधी
भाजपने एेनवेळी स्मिता वाघ यांचे जाहीर झालेले तिकीट रद्द करून उन्मेष पाटील यांना दिले. त्यानंतरच अमळनेरमध्ये पक्षाच्या व्यासपीठावर हाणामारी झाली. मंत्री गिरीश महाजन हे जळगावचे. ते मुख्यमंत्र्यांचे अगदी विश्वासू मानले जातात. मात्र, त्यांना धक्काबुक्की होईपर्यंत पक्षांतर्गत असंतोषाची मजल गेली. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांचा पराभव करुन भाजपचे ए.टी.पाटील सुमारे तीन लाख मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत मात्र त्यांना उमेद्वारी मिळाली नाही. राष्ट्रवादी कांॅग्रेसने गुलाबराव देवकर यांना रिंगणात उतरवले आहे.


भाजपचे उमेद्वार उन्मेष पाटील यांची आमदार म्हणून कामगिरी प्रभावी आहे. गिरीश महाजन यांची निवडणूक यंत्रणा त्यांच्यासोबत आहे, मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नीचे तिकीट कापल्यामुळे त्यांच्या गटाची नाराजी मोठी आहे. शिवाय, उन्मेष यांना खडसेंचा पाठिंबा असला तरी कार्यकर्ते मात्र त्यांच्यासोबत दिसत नाहीत. गुलाबराव देवकरांचे नाव वादग्रस्त आहे हे खरेच, पण ग्रामीण भागात त्यांची मोठी पकड आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राखणे भाजपसाठी वाटते तेवढे सोपे नाही.


रावेर ः खडसेंचा बालेकिल्ला
२०१४ मध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा तीन लाख मतांनी पराभव केला हाेता. या वेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील याना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकनाथ खडसे यांची मोठी पकड आहे. शिवाय बहुसंख्य लेवा समाज खडसे यांच्यासोबत आहे. डाॅ. उल्हास पाटील यांची प्रतिमा चांगली आहे. ग्रामीण भागात चांगला संपर्क आहे. पण, खडसेंच्या बालेकिल्ल्याला धक्का देणे एवढे सोपे नाही.


नाशिक ः भुजबळांच्या अस्तित्वाची लढाई
२०१४ मध्ये हेमंत गाेडसे यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजनदार नेते छगन भुजबळ यांचा १ लाख ८७ हजार मतांनी पराभव केला हाेता. आता हेमंत गोडसेंच्या विरोधात भुजबळ यांचे पुतणे समीर उभे आहेत. समीर याच मतदारसंघातून २००९ मध्ये खासदार झाले होते. तेव्हा काकांनीच खिंड लढवली होती. आताही छगन भुजबळ यांच्याकडे प्रचाराची सूत्रे आहेत. ईडीच्या चौकशीनंतर छगन आणि समीर भुजबळांना तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर ‘भुजबळ संपले’, अशी चर्चा होती. आता अधिक त्वेषाने हे दोघेही प्रचार करत आहेत. भाजपचे बंडखोर माणिकराव काेकाटे उभे असल्याने समीर यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अर्थात, या मतदारसंघावर भाजप- शिवसेनेची मजबूत पकड आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.


दिंडाेरी ः आयात उमेदवारांमध्ये लढत
२०१४ मध्ये भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तब्बल अडीच लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डाॅ. भारती पवार यांचा पराभव केला हाेता. भाजपने हरिश्चंद्र चव्हाणांची उमेद्वारी रद्द करत आता डॉ. भारती पवार यांनाच रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना उभे केले आहे. त्यामुळे दाेन्ही आयात उमेदवारांत लढत आहे.


माकपचे काॅ. जीवा पांडू गावीत यांच्यामुळे काँग्रेस आघाडीची काही मते कमी होऊ शकतात. पण, या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे. शिवाय, उमेद्वारी कापल्याने हरिश्चंद्र चव्हाणांचा गट नाराज आहे. भाजपमधील ही धुसफूस राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते.

X