Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Election2019 narendra modi rally in nashik and nandurbar

माेदींचा ‘पवारविराेध’ म्यान; दलालांविराेधात लढाई, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याची ग्वाही

प्रतिनिधी | Update - Apr 23, 2019, 08:39 AM IST

देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळेल किसान सन्मान याेजनेचा लाभ; पाच एकरची अट काढून टाकणार

 • Election2019 narendra modi rally in nashik and nandurbar

  नाशिक/ नंदुरबार - महाराष्ट्रात आजवर झालेल्या प्रत्येक प्रचारसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मात्र ‘पवारविराेधा’ची तलवार म्यान केली. साेमवारी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत व नंदुरबार या ठिकाणी माेदींच्या दाेन प्रचारसभा झाल्या. त्यात त्यांचा भर विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या याेजनांवरच दिसला. ‘वार्षिक सहा हजार रुपये अर्थसाहाय्य देणारी शेतकरी सन्मान योजनेतील पाच एकरची अट आता काढून टाकण्यात येईल व देशातील सर्व शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळेल,’ अशी घाेषणा त्यांनी केली. नाशिकचे पाणी इतरत्र पळवले जाणार नाही, आदिवासींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनुक्रमे हेमंत गाेडसे व भारती पवार तसेच नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ या सभा झाल्या.


  शेतकरी नेते नजरकैदेत
  पिंपळगाव बसवंत येथील सभेत संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जाण्याची शक्यता हाेती. या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी आधीपासूनच सतर्कता बाळगली हाेती. या सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांना थेरगाव (ता. निफाड) येथे नजरकैदेत ठेवले हाेते. ‘लोकशाहीत भाजप सरकार शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडता नाहीत,’ अशी प्रतिक्रिया अर्जुन बोराडे यांनी दिली.


  नाशिकबद्दल ‘सप्तरंगी’ गाैरवाेद‌्गार
  टेलिप्राॅम्प्टरच्या मदतीने माेदी यांनी सभेची सुरुवातच मराठीतून करत नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचा संदर्भ दिला. ‘नाशिकचे नाव घेताच माझ्यासमाेर संस्कृतीचे सात रंग दिसतात. या पुण्यभूमीचा पहिला रंग म्हणजे श्री सप्तशृंगी माता, दुसरा कुंभमेळा, तिसरा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, चौथा रंग म्हणजे भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा रहिवास, पाचवा रंग अंजनेरी येथील हनुमानाचे जन्मस्थान, सहावा रंग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आणि सातवा रंग म्हणजे समतेच्या लढ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काळाराम मंदिर सत्याग्रहाचे आंदाेलन… अशा विविध रंगांनी नटलेले हे तीर्थक्षेत्र आहे. मी आज पावनभूमीत येऊन धन्य झालो,’ असे माेदी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.


  ‘चाेर’ म्हणणाऱ्या राहुलना मागावी लागली माफी
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘चौकीदाराला चोर म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना सर्वाेच्च न्यायालयात माफी मागावी लागली. न्यायालय त्यांना माफी देईल की नाही याची कल्पना नाही. पण जनता मात्र त्यांना कधीच माफ करणार नाही. अतिरेकी हल्ल्याबाबत मनमोहन सिंग यांनी कधीच उत्तरे दिली नाहीत. पण मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले,’ असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Trending