आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - राष्ट्रवादीच्या मावळ लाेकसभा मतदारसंघातील उमेदवाराची गेल्या वेळी अनामत रक्कम जप्त झाली आहे. राष्ट्रवादीचे कुठेही प्राबल्य नसताना राष्ट्रवादी काँग्रेस केवळ कुटुंबातील माणूस पुढे करून निवडणुकीला सामाेरे जात आहे. राष्ट्रवादीचे नेते किंवा पवार कुटुंबीय यापूर्वी कधीही रस्त्यावर प्रचारासाठी उतरले नव्हते. मात्र, मुलाचा पराभव समाेर दिसत असल्याने ४० डिग्री तापमानात अख्खे पवार कुटुंबीय भरउन्हात रस्त्यावर उतरून प्रचार करत असल्याची टीका शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी केली.
मावळ लाेकसभा मतदारसंघाचे उमेदवार बारणे यांचा उमेदवारी अर्ज आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येथे दाखल करण्यात आला. यापूर्वी आकुर्डी खंडाेबा माळ ते प्राधिकरण कार्यालयादरम्यान शिवसेना, भाजप व मित्रपक्षांनी भव्य रॅली काढली. बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसार्इ, राज्यमंत्री विजय शिवतारे, डाॅ.नीलम गाेऱ्हे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार संजय भेगडे, आमदार गाैतम चाबुकस्वार, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराने राष्ट्रवादीचे नेतृत्व नाकारले असून महापालिकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. मावळ लाेकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत युतीचे आमदार आहेत. देशहिताच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण निवडणूक असून मतदार जाणकार असून ते अचूक निर्णय घेतील. पाच वर्षांच्या कालावधीत मी केंद्राच्या अनेक याेजना मतदारसंघात राबवल्या आहेत. तसेच मतदारसंघात पाच वर्षे वेळाेवेळी लाेकांशी जाेडलाे आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असेल. केंद्रात नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, बारणे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना फायदा होण्यासाठी शक्यता आहे.
महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू : आदित्य
आदित्य ठाकरे म्हणाले, सर्वत्र भाजप-शिवसेना-रिपाइं युतीचा झंझावात दिसत असून राज्यातील ४८ जागा युतीला मिळतील. देशाला मजबूत सरकार पाहिजे आहे की मजबूर सरकार हवे आहे. एनडीएचे सरकार बनल्यानंतर माेदी सक्षम पंतप्रधान म्हणून पुन्हा समाेर येतील. मोदी हे देशासमोर सक्षम पर्याय असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तसेच आमचे उमेदवार हे मताधिक्याने निवडणून येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.