आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ ग्राउंड रिपोर्ट : शेतकऱ्यांंच्या संतापाचाही पारा चढला, भाजपला फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात सध्या सूर्य आग ओकतो आहे. राजकीय वातावरणही तापलेले आहे. दीक्षाभूमीजवळच्या ठेल्यावर लिंबू सरबत पीत असताना मनोज राठोड भेटले. साठी उलटलेले. रिक्षा चालवतात. मूळचे यवतमाळचे. पण नापिकीमुळे गाव सोडले. गेल्या चाळीस वर्षांपासून ते नागपूरमध्ये आहेत.


‘नाना पटोलेंना किरकोळ समजू नका’, असे ते त्यांच्याबरोबर असलेल्या पॅसेंजरला सांगत होते.ं मी तपशिलात विचारल्यावर म्हणाले, ‘नाना पटोले गडकरींना घाम फोडताहेत.’ कुणबी, मुस्लिम मतांच्या पाठिंब्यामुळे पटोले चांगली मते मिळवू शकतात, असा त्यांचा अंदाज.
एकूणच नागपूर सध्या बातम्यांमध्ये आहे. तसेही नागपूर चर्चेत असतेच. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणारे नागपूर. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या आणि हिंदू राष्ट्रवादाचे प्रमेय मांडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय जसे नागपूर, तसेच हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे घेतली, तेही नागपूरच. निवडणुकीच्या या रणधुमाळीत नागपूर महत्त्वाचे ठरते आहे, ते नितीन गडकरी यांच्यामुळे. लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा कल दिसत असताना, मोदींऐवजी गडकरींचे नाव पुढे आणले जाईल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघही दक्षिण-पश्चिम नागपूर असल्याने, त्या संदर्भानेही नागपूर महत्त्वाचे. 


पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि यवतमाळ-वाशीम अशा सात लोकसभा मतदारसंघांत उद्या, ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बहुतेक मतदारसंघांत दोन पक्षांमध्ये थेट लढती आहेत. गेल्या वेळी या सातही जागांवर भाजप- शिवसेना युतीला यश मिळाले होते. पूर्व आणि मध्य विदर्भात शेतकऱ्यांचा आक्रोश, तसेच वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाला दिलेली बगल हे दोन मुद्दे या वेळी सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात. मतदार फारसा बोलत नाही. पण, शहरी आणि तरुण मतदारांवर अद्यापही मोदींचा प्रभाव दिसतो आहे, तर गावांमध्ये मात्र सरकारविषयीची नाराजी ठळक आहे.


नागपूर ः हा लोकसभा मतदारसंघ एकेकाळचा काँग्रेसचा गड. मागच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तो दुसऱ्यांदा भाजपकडे खेचून आणला. काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांचा त्यांनी २ लाख ८४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडेच होता. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार निवडून आले होते. काँग्रेसने नाना पटोले या आक्रमक प्रतिमेच्या उमेदवाराला उभे करून प्रामुख्याने कुणबी मतांचे कार्ड खेळले आहे. कुणबी मतांची संख्या इथे मोठी आहे. मतदारसंघातील मुस्लिम, दलित, कुणबी आणि हलबा समाजातील भाजपविरोधी असंतोष हेच गडकरी यांच्यापुढे खरे आव्हान आहे.


वर्धा ः महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमामुळे जगभर ठाऊक झालेला जिल्हा म्हणजे वर्धा. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांनी काँग्रेसचे सागर मेघे यांचा दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला होता. एकेकाळी हा मतदारसंघदेखील काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यंदा भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि माजी नेत्या प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांच्यात प्रमुख लढत आहे. या मतदारसंघात तेली आणि कुणबी असे जातीय समीकरण महत्त्वाचे ठरते. वर्ध्यात चारुलता टोकस यांच्यामागे कुणबी मतदार उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लढत तुल्यबळ ठरणार आहे. 


रामटेक ः हा नागपूर ग्रामीणमधील अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचा सुमारे पावणेदोन लाखांच्या फरकाने पराभव केला होता. यंदाची लढत प्रामुख्याने शिवसेना-भाजप युतीचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात आहे. किशोर गजभिये हे माजी सनदी अधिकारी आहेत. या मतदारसंघात हिंदू आणि बौद्ध- दलित असा मुद्दा दरवेळी प्रभावी ठरत असतो. कॉंग्रेसला इथे विजय मिळवणे अशक्य नव्हते. पण काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी बंडखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, तो फसला. गजभिये पक्षात नवखे आहेत. त्यांना पक्षाकडून कितपत साथ मिळते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. 


भंडारा-गोंदिया : लोकसभा मतदारसंघात पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपला आलटून पालटून यश मिळालेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या वतीने नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा दोन लाखांवर मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र, पटोले यांनी भाजप सोडून राजीनामा दिल्याने २०१८ मध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांचा ४८ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. आता पटोले कॉंग्रेसमध्ये गेलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नाना पंचबुद्धे आणि भाजपचे सुनील मेंढे यांच्यात लढत आहे. जातीय समीकरणे याही मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.


चंद्रपूर : लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार संजय देवतळे यांचा २ लाख ३६ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. या वेळी भाजपचे हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार बाळू धानोरकर यांच्यात लढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे कोणाची मते खातात, यावर हा निकाल अवलंबून आहे. हंसराज अहिर केंद्रात मंत्री आहेत. मात्र, अकार्यक्षम खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे. अर्थात, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे याच भागातील आमदार आहेत. भाजपची पक्षसंघटना इथे मजबूत आहे. याउलट काँग्रेसने बाळू धानोरकर यांना उमेदवारी देऊन कुणबी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसची (गटबाजीने ग्रासलेली!) पक्षसंघटना धानोरकरांच्या सोबत नेटाने उभी राहिली, तर अहिरांना ही निवडणूक सोपी नाही. 


गडचिरोली: हा अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असा मतदारसंघ. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांनी काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांना २ लाख ४४ हजार मतांच्या फरकाने पराभूत केले होते. भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यातच या वेळी प्रमुख लढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. रमेश गजबे यांची मते निर्णायक ठरणार आहेत. विद्यमान खासदाराविषयीच्या नाराजीचा फायदा कॉंग्रेस किती करुन घेते, त्यावर या लढतीचा निकाल अवलंबून आहे. 


यवतमाळ-वाशिम : मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा ९२ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता, या वेळी शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात प्रमुख व तुल्यबळ लढत आहे. भाजपचे बंडखोर पी. बी. आडे या बंजारा समाजाच्या नेत्याने बंडखोरी केली आहे.. बंजारा समाजाची मतदारसंघात साडेतीन लाख मते आहेत. मतांच्या विभाजनाचा माणिकराव ठाकरे यांना फायदा होऊ शकतो.


दुसऱ्या टप्प्याचे मतदान १८ एप्रिलला होत आहे. त्यात अकोला, अमरावती, बुलडाणा या विदर्भातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत या सर्व जागा भाजप शिवसेनेने जिंकल्या आहेत. सर्व विद्यमान खासदार पुन्हा रिंगणात उतरले आहेत. 
अकाेल्यात भाजपचा किल्ला भेदणे सोपे नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे हिदायतुल्ला पटेल विरोधात असले तरी भाजपचे संजय धोत्रे यांना धक्का देण्यात त्यांना कितपत यश येते, ते निकालानंतरच समजेल. अमरावतीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढणाऱ्या नवनीत राणा शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना झुंज देत आहेत. बुलडाण्यात मात्र शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणेंचे आव्हान तगडे झाले आहे. कॉंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मनापासून शिंगणेंसाठी काम करताना दिसत आहेत. याउलट युती मात्र एकसंध दिसत नाही.


विदर्भातील सर्व दहा मतदारसंघांनी २०१४ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेची सोबत केली होती. यावेळी मात्र भाजप- शिवसेनेला किमान तीन जागांचा फटका बसणार, असे एकूण चित्र आहे.