Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Election2019:Modi and Shaha shall not be in politics, take oath

मोदी- शहा राजकीय क्षितिजावरच दिसणार नाहीत, असा निर्णय घ्या!

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 10:59 AM IST

राज ठाकरेंची साद- केंद्र- राज्य सरकारच्या कारभाराचे पितळ ‘पीपीटी’द्वारे केले उघड

 • Election2019:Modi and Shaha shall not be in politics, take oath

  सोलापूर- ‘पाच वर्षांपूर्वी दाखवलेल्या स्वप्नांबद्दल अवाक्षरही न बोलता पंतप्रधान मोदी आता शहिदांच्या नावाने मते मागत आहेत. शहिदांच्या कुटुंबाकडे पाहायला त्यांना वेळ नाही. परंतु त्यांच्या नावाने मते मागण्याचा असा निर्लज्जपणा यापूर्वी कधी पाहिला नाही. निवडणुकांच्या तोंडावरच ‘ते’ युद्धसदृश्य स्थिती निर्माण करणार, हे मी सांगितलेच होते. तशीच घटना घडली. पुलवामाच्या घटनेसाठी आरडीएक्स कुठून आला, याचे उत्तर आहे? मोदी- शहा ही दुकली लोकशाही यंत्रणा मोडू पाहत आहे. त्यांना हिटलरशाही आणायचे आहे. म्हणूनच या निवडणुकीत असा निर्णय घ्या, की हे दोघेही राजकीय क्षितीजावर दिसणार नाहीत. यासाठीच मी तुम्हाला जागं करायला आलोय’, अशी साद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सोलापूरकरांना घातली.


  जनसमुदायासमोर त्यांनी ‘फ्लॉप मोदीं’चे पॉवर प्रेझेंटेशन केले. मोदींच्या थापा आणि वास्तव हे चित्रच त्यांनी सभेत उभे केले. इतकेच नव्हे, मोदींच्या जाहिरातीतील नायकांना भरसभेत बोलावून लोकांना तोंडात बोटे घालायला लावली. ते म्हणाले, “खोट्या जाहिरातींवर चार हजार ८८० कोटी रुपयांचा खर्च झाला. दुसरीकडे मनसेच्या सभांवरील खर्चाकडे भाजप पाहत आहे. गेल्या पाच वर्षांतील तुमच्या थापा मोजत बसा. कुठे आहे स्टार्टअप इंडिया? मेक इन इंडिया? स्मार्ट सिटीचे काय झाले? मोदींनी जनतेच्या हाती काय दिले? १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या?’ असा सवालही राज यांनी केला.


  जातीत लावली भांडणं
  ठाकरे यांनी फडणवीस सरकारचाही समाचार घेतला. ‘मराठा, धनगर यांना आरक्षण देतो म्हणून भांडणे लावली. दुसरीकडे सरकारी नोकऱ्याही ठेवल्या नाहीत. खासगी कंपन्यांमध्ये महाराष्ट्राबाहेरील तरुण येऊ लागला. इथे भांडणात गुंतलेल्या मराठी तरुणाचे त्याकडे लक्षच नाही. पुणे, मुंबई, नाशिकच्या खासगी कंपन्यांमध्ये जाऊन पाहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘आम्ही १ लाख २० हजार विहिरी खोदल्या. कुठल्या विहिरीवर मुख्यमंत्री जाऊन पाणी भरले? मराठवाड्यात हजार, बाराशे फूट खोल बोअरला पाणी नाही. दुष्काळात महाराष्ट्र होरपळून निघतोय आणि यांना पाणीच पाणी दिसतंय.’


  पवार, राज एकाच हॉटेलात
  सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोलापुरात सभा घेतली. त्यानंतर ते नियोजित हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील शहरात सभेसाठी आले होते. राज ज्या हॉटेलात थांबले होते, त्याच हॉटेलात पवारही मुक्कामाला होता. त्यामुळे एकच राजकीय खसखस पिकली.

Trending