आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखें पाटील यांचा राजीनामा स्वीकारून जिल्हा कार्यकारिणी केली बरखास्त, अशोक चव्हाणांची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात ऐननिवडणुकीच्या तोंडावर मोठे ग्रहण लागले आहे. पक्षाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलाय, तर नगरचे जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनीही पदाचा राजीनामा दिला. दोघांचाही राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची उद्या शिर्डी मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये सभा आहे, त्यापूर्वीच काँग्रेसला हे दोन मोठे धक्के बसले आहेत.


अंतर्गत वादातून विखे समर्थक असलेले करण ससाने यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. विखेंनी अजून पक्ष सोडलेला नाही, पण त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत, त्यांनी पक्षाच्याच विरोधात काम केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यावर विचार करुन निर्णय घेऊ, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.


विखे पाटील यांनी काल समर्थकांचा मेळावा घेत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याची टीका केली होती. शिवाय त्यांची राजकीय भूमिका ते 27 तारखेला जाहीर करणार आहेत. सध्या ते जाहीरपणे शिवसेना-भाजप युतीचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विखे पाटलांवर काय निर्णय होतो, त्याकडे लक्ष लागले आहे.


शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे पाटलांचे मोठे वर्चस्व आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटलांनी थोरातांच्या बालेकिल्ल्यात बैठकींचे आणि मेळाव्यांचे सत्र सुरू केले आहे. संगमनेरमध्ये सुजय यांनी आज पाच छोट्या-मोठ्या सभा घेत थोरातांवर घणाघात केला. युतीचे प्रामाणिकपणे काम करा, पाच वर्षात घड्याळ आणि पंजा हद्दपार करू, असे वक्तव्य सुजय यांनी संगमनेरातील सभेत केले.


महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात शिर्डी मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...