Home | Maharashtra | Pune | Election2019:There isn't any strong opposition in Maharshtra election

राज्यात दुसरा सक्षम विरोधकच नसल्याने मोदींच्या टीकेचा रोख शरद पवारांवर

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 08:28 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीतील इतर नेत्यांची ताकद एक-दोन जिल्ह्यापुरतीच मर्यादित; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे मत

 • Election2019:There isn't any strong opposition in Maharshtra election

  पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील प्रचारसभांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. कारण पवार हे मोदींना आव्हान देणारे एकमेव नेते राज्यात उरले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्यांची जिल्ह्यापलीकडे ताकद दिसून येत नाही. त्यामुळे पवारांचे खच्चीकरण करून ४ ते ५ जागा जिंकण्याची रणनीती मोदी यांनी आखल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर पवार यांनी देशभरात वििवध पक्षांच्या आघाडीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडीतील पवारांच्या भूमिकेस लक्ष्य करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरू असल्याचे विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी मंगळवारी मांडले. पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ‘२०१९ची निवडणूक समजून घेताना’ या विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

  काँग्रेस : प्रभाव पाडण्यात पक्ष मागेच
  नेतृत्व : काँग्रेस हा प्रमुख राष्ट्रीय पक्ष असला तरी त्यांच्याजवळ एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून सांगणारे नेतृत्व नसल्याचा अभाव दिसून येत आहे. मात्र, भाजपकडे अशा प्रकारचे नेतृत्व आणि संबंधित गोष्ट चवीने रंगवून सांगणारे कार्यकर्ते उपलब्ध असल्याचा फायदा संबंधित पक्षास मिळत आहे.

  राहुल गांधी : राहुल हे उत्कृष्ट वक्ते नाहीत. तसेच त्यांची समाजातील स्वीकारार्हता कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचा केंद्रीय जाहीरनामा स्थानिक भाषेत प्रभावीपणे समजावून सांगणाऱ्या स्थानिक नेतृत्वाचा अभाव दिसत आहे.


  निवडणुकीतील मुद्दे :

  पुलवामा, बालाकोट एअर स्ट्राइक या मुद्द्यांचे आकर्षण १५ दिवसांत ओसरल्याने काही प्रमाणात चुरशीची निवडणूक पाहावयास मिळू शकेल. त्या दृष्टीने पुढील ३ आठवड्यांत निवडणुकीत नवीन मुद्द्यांची मांडणी होईल.

  वंचित बहुजन : महाआघाडीला फटका

  वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत फटका बसू शकेल, अशी परिस्थिती आहे. प्रकाश आंबेडकर हे तीन दशकांपासून राजकारणात आहेत. पक्षवाढीचा हेतू त्यांच्यासमोर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत संख्याबळ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

  मनसे : परिणाम मर्यादितच असेल

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाआघाडीत सामील न झाल्याने तसेच त्यांच्या पक्षाचा कोणताच उमेदवार निवडणुकीस उभा नसल्याने त्यांचा परिणाम मर्यादित स्वरूपाचा राहील, असे दिसते. मागील १० ते १५ वर्षांच्या काळात त्यांच्या पक्षाचा विस्तार ठराविक भागापुरताच झालेला आहे.

  शिवसेना : यंदा जागा घटणार

  मागील निवडणुकीत भाजपसोबत युतीमुळे शिवसेनेला फायदा झाला. यंदा भाजपच्या जागा घटतील. परिणामी शिवसेना, अकाली दल यांनाही काही जागा गमावाव्या लागतील. यंदाच्या निवडणुकीत मोदींसाठी लोकमत अनुकूल आहेच, पण ते सांगतील त्या उमेदवाराला मत देण्याची मतदारांची भावनात्मकता कमी झाली आहे.

  भाजप : प्रचारात विकास, राष्ट्रवाद, हिंदुत्व हेच प्रमुख मुद्दे
  विकासाचा गाजावाजा नाही : भाजपसमोर प्रचारासाठी प्रमुख तीन मुद्दे आहेत. ५ वर्षांतील विकासकामांच्या आधारे निवडणुकीत उतरणे त्यांच्यासाठी अवघड आहे. देशासमोर अनेक जटिल प्रश्न असून त्याची सोडवणूक करण्यासाठी एक देवदूत आल्याची प्रतिमा भाजप व मोदींनी प्रचारात निर्माण केली आहे. त्यात ते यशस्वीही ठरले आहेत. मोदींच्या प्रतिमेस अद्याप तडा गेलेला नसून त्यांच्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या भ्रमनिरास झालेल्यांपेक्षा अधिक आहे.


  राष्ट्रवादावर भर : या मुद्द्यावर आपल्याशिवाय इतर कोणताही पक्ष राष्ट्रप्रेमी नसल्याचे भाजप भासवत आहे. पुलवामाच्या घटनेत भारताची सुरक्षा कशा प्रकारे धोक्यात आहे, हे सांगणे त्यांना सोपे गेले. सुरक्षेतील गलथानपणापेक्षा राष्ट्रीयत्व बळकट करण्यावर त्यांनी भर दिला. नंतर हवाई हल्ल्याची भर पडल्याने सुरक्षेआडून राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणण्यात आला.

  ३० ते ६० जागा घटणार : यंदा भाजपच्या ३० ते ६० जागा घटण्याचा अंदाज आहे. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत केंद्रीकरणावर भर दिला जात आहे. यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथे घटणाऱ्या जागांवर धार्मिक मुद्द्यांवर केंद्रीकरण करणे आणि कमी मते पडणाऱ्या जागा निवडून आणणे हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपची हिंदू राष्ट्रवाद मुद्द्यावर नैसर्गिक ताकद आहे.

Trending