Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Election2019:Uddhav Thakre Sabha in Parbhani

५६ पिढ्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी भगवा फडकणारच

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 11:12 AM IST

परभणीतील सभेत उद्धव ठाकरेंचा विश्वास, वादळी वाऱ्याने उडाला गोंधळ

 • Election2019:Uddhav Thakre Sabha in Parbhani

  परभणी- परभणीसह मराठवाड्यात शिवसेनाप्रमुखांनी पेरलेल्या बीजांना आता धुमारे फुटले आहेत. परभणी तर भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. विरोधकांना माझे खुले आव्हान आहे. ५६ पक्षच काय ५६ पिढ्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी हा भगवा फडकणारच, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी(दि.१४) सायंकाळी येथील स्टेडियम मैदानावर झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. सभे दरम्यान उठलेल्या वादळ वाऱ्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अशाही स्थितीत ठाकरे यांनी थेट २० मिनिटे संवाद साधला.


  युतीचे उमेदवार खा.संजय जाधव यांच्या प्रचारार्थ स्टेडियम मैदानावर सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, मिलिंद नार्वेकर, माजी आ.विजय गव्हाणे, माजी आ.हरिभाऊ लहाने, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, मेघना बोर्डीकर, अभय चाटे आदींची प्रमुख उपस्थित होती.


  ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार व राहुल गांधींवर कडाडून टीका केली. सत्तेत असताना दुष्काळग्रस्तांच्या चारा छावण्यांसह शेण घोटाळा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता शेतकऱ्यांचा कळवळा येऊ लागला आहे. उस्मानाबाद मध्ये शरद पवार यांनी चारा छावणीला दिलेल्या भेटीचा ठाकरे यांनी समाचार घेतला. आमच्या भगव्यात जोश व उत्साह आहे, तो तुमच्या फडक्यात नाही. आघाडी करताय करा. परंतु भगव्याच्या, हिंदुत्वाच्या व मोदींच्या द्वेषाने करू नका. कारण आमचा जोश व तुमचा द्वेष दिसून आला आहे. हाच जोश देशाला सांभाळल्या शिवाय राहणार नाही, असाही विश्वास व्यक्त करीत भाजपशी केलेली युती हे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणारी ठरली आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. राहुल गांधी व शरद पवारांच्या घोटाळ्याचे पुस्तक पाच वर्षांपूर्वी काढले होते. हेच घोटाळेबाज आज आमची लाज काढायला निघाले आहेत. स्वतः दरोडेखोर असताना दुसऱ्यांना चोर ठरवणाऱ्यांनाच लाज का, वाटत नाही असा सवाल ठाकरे यांनी केला.


  वादळी वाऱ्याने उधळली सभा
  सायंकाळी संपूर्ण शहरावर आभाळ भरून आले होते. साडेसातच्या सुमारास स्टेडियम जनसमुदायाने भरून गेलेले असताना जोरदार वारे वावधान सुरू झाले. व्यासपीठावर होर्डिंगही वाकले. चटई, खुर्च्या अस्ताव्यस्त पसरल्या. धुळीचे लोट उडू लागल्याने एकच गोंधळ उडाला. पावणे आठच्या सुमारास ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांनी लगेचच माईकचा ताबा घेतला. पावसाचे थेंब सुरू झाल्यानंतर ठाकरे यांनी भाषण आटोपते घेतले.

Trending