Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Election2019:Who will be winner in Maharashtra Loksabha election 2019

कल कुणाकडे...? २०१४ मध्ये आघाडीला ३४.४०%, युतीला मिळाली होती ५०.७०% मते; गेल्या वेळी युतीला मोदी लाटेचा फायदा

महेश जोशी | Update - Apr 17, 2019, 08:49 AM IST

राज्यात विजयासाठी आघाडीसमोर १६% मतांचे अंतर कापण्याचे आव्हान

 • Election2019:Who will be winner in Maharashtra Loksabha election 2019

  औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला पार पडल्यानंतर मतदानाचा दुसरा टप्पा जवळ येऊन ठेपला आहे. शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि बहुजन वंचित आघाडी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत विजयासाठी आटापिटा करत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील मतांचे अंतर १६ टक्के होते. दोन उमेदवार वगळता शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार एक लाख मतांपेक्षा अधिक फरकाने जिंकून आले होते. त्या वेळी देशभरातील मोदी लाटेने युतीच्या अनेक उमेदवारांना सावरून नेले होते. यंदा अशी लाट नसली तरी काँग्रेस आघाडीसमोर बहुजन वंचित आघाडीचे संकट आहे. यामुळे १६% मतांचे अंतर कापणे आघाडीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.


  एरवी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मतांचे अंतर ८ ते १० टक्क्यांहून अधिक नसते. पण
  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोेदी लाटेचा प्रभाव होता. राज्यात ४८ पैकी ४२ ठिकाणी युतीची सरशी झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. आघाडीला ३४.४०%, युतीला ५०.७०% मते मिळाली होती.


  युतीच्या ४० उमेदवारांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय
  २०१४ मध्ये मोदी लाटेवर स्वार होत युतीच्या ४२ पैकी ४० उमेदवारांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला होता. लाखापेक्षा कमी फरकाने विजयी होणारे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे होते.


  यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी ९४ हजार, तर रायगडचे शिवसेना उमेदवार व सध्याचे केंद्रीय मंत्री अनंत गिते अवघ्या २,११० मतांनी कसेबसे विजयी झाले होते.


  वंचित बहुजनचे आव्हान
  २०१४ मधील आघाडी आणि युतीतील मतांचे अंतर आणि विजयी आणि पराभूत उमेदवारांतील मतातील फरक लक्षात घेतला तर यंदा आघाडीसाठी विजयाचा मार्ग खडतर ठरणार आहे. गेल्या वेळी युतीसोबत असणारे राजू शेट्टी यंदा आघाडीसोबत आहेत. त्यांनी कमावलेली २.३० टक्के मते आघाडीसाठी फायद्याची ठरू शकतात. मात्र, प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची वंचित बहुजन विकास आघाडी ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हक्काच्या दलित-मुस्लिम मतांत विभागणी होऊन त्याचा युतीला फायदा होण्याची शक्यता निवडणूक विश्लेषक वर्तवतात.


  20 उमेदवार
  एक लाखाहून अधिक फरकाने विजयी
  14 उमेदवार
  दोन लाखांहून अधिक फरकाने विजयी
  05 उमेदवार
  तीन लाखांहून अधिक फरकाने विजयी
  01 उमेदवार
  चार लाखांहून अधिक फरकाने विजयी
  02 उमेदवार
  एक लाखाहून कमी फरकाने विजयी

Trending