आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिल महिन्यापासून वीज बिल थकवणाऱ्या 12 हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत गत एप्रिल महिन्यापासून ४२ कोटी ७६ लाख रुपयांच्या वीज बिल थकवणाऱ्या जिल्ह्यातील १२ हजार ६२४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, १ नोव्हेंबरपासून बिल भरण्यासाठी चेक दिल्यानंतर तो बाउन्स झाल्यानंतर ३५० रुपयांऐवजी थेट दीड हजार भरावे लागणार आहे.


वीज बिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरमहा वीज बिलांसह वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत थकीत वीज बिलांचे प्रमाण जास्त आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे, कार्यकारी अभियंता मनोज त्रिंबके, अर्शदखान पठाण यांच्यासह सर्व क्षेत्रीय अभियंत्यांनी वसुली व थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.

 

गत एप्रिल महिन्यापासून एकदाही वीज बिल न भरणारे जालना विभाग एकमध्ये २९ हजार ५८५ ग्राहक असून, त्यांच्याकडे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे, तर जालना विभाग दोनमध्ये २५ हजार २४२ ग्राहकांकडे २७ कोटी ७६ लाख रुपये थकबाकी आहे. या ग्राहकांपैकी थकबाकी वसुली मोहिमेत आतापर्यंत जालना विभाग एकमध्ये ३ हजार ६८ ग्राहकांचा वीजपुरवठा ३ कोटी २५ लाखांच्या थकबाकीपोटी तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. तर ५५४ ग्राहकांचा वीजपुरवठा ९५ लाखांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.


जालना विभाग दोनमध्ये ८ हजार ७१ ग्राहकांचा वीजपुरवठा ११ कोटी ७६ लाखांच्या थकबाकीपोटी तात्पुरता खंडित करण्यात आला, तर ९३१ ग्राहकांचा वीजपुरवठा २ कोटी २८ लाखांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. एप्रिलपासून बिल थकवणाऱ्या ग्राहकांपैकी जालना विभाग एक मधून ८ हजार १७० ग्राहकांनी ३ कोटी ६८ लाख तर जालना विभाग दोन मधून ४ हजार ३२३ ग्राहकांनी १ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.


जिल्ह्यात सात महिन्यांपासून दोन विभागात ४२ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी, चेक बाउन्स झाल्यास आता ३५० ऐवजी भरावा लागणार दीड हजार रुपयांचा दंड
५५४ ग्राहकांचा वीजपुरवठा कायम खंडित
शहरातील ५५४ ग्राहकांनी अद्यापही वीज बिल न भरल्यामुळे ९५ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी कायमस्वरूपी न भरल्यामुळे ५५४ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


आता दीड हजार रुपयांचा दंड
वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाउन्स) झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीज दराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला असून १ नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.


वीज बिल थकवू नका; अन्यथा कारवाई
वीजपुरवठा खंडित न होण्यासाठी ग्राहकांनी वीज बिल थकवू नये याची काळजी घ्यावी. सलग सहा महिने बिल थकवल्यास वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. यासाठी नागरिकांनी वीज बिल न थकवता वेळेवर भरत राहावे, जेणेकरून कारवाईस सामोरे जावे लागणार नाही.

बातम्या आणखी आहेत...