आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरातील 2 हजार वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर; विद्युत पुरवठ्यावर परिणाम होण्याची आहे शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्र सरकारच्या अधिकारातील सूत्रधारी कंपनीसह, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील वीज कर्मचारी, अभियंते यांनी ७ ते ९ जानेवारी या काळात ७२ तासांचा लाक्षणिक संप पुकारला आहे. प्रलंबित प्रश्न व महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील ८६ हजार तर सोलापुरातील २ हजार वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत. दरम्यान, महावितरण प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. तरीही विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

 

महावितरण कंपनीतील पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सूचना अंमलात आणावे, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करत असताना आधीची एकूण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावे, सरकार व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीकडून राबवण्यात येत असलेले खासगीकरण, फ्रॅन्चाइजीकरण धोरण थांबवावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मिती संचाचे सरकारने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे, महानिर्मिती कंपनीच्या २१० एमव्हीचे संच बंद करण्याचे धोरण तत्काळ थांबवावे, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, तसेच बदली कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे व समान काम समान वेतन, या बाबतीत सर्वोच न्यायालयाचा निकाल लागू करावा आदी मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. या संघटनांनी महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन दिले. यातील बऱ्याच लोकप्रतिनिधींनी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे याबाबत तत्काळ बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र तोडगा निघालाच नाही. 

 

काही मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. बाहेरून आणलेले कर्मचारी, शिकाऊ कर्मचारी, ठेकेदार यांच्याकडून मदत घेऊन आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे विजेची समस्या होणार नाही आणि वीज ग्राहकांना याचा काहीच त्रास होऊ देणार नाही. ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण