आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक गुरु आपल्या शिष्यांना नेहमी एक गोष्ट सांगायचे- प्रत्येक कणाकणात देव आहे, अशी एकही वस्तू आणि ठिकाण नाही जेथे देव नाही. सृष्टीवरील प्रत्येक गोष्टीला देव मानून त्यांना नमन करावे. हे ज्ञान त्यांनी सर्व शिष्यांना दिले होते.
एके दिवशी त्यांचा एक शिष्य बाजारातून घरी चालला होता. तेवढ्यात त्याला रस्त्यावरून एक पिसाळलेला हत्ती धावताना दिसला. माहूत मोठमोठ्याने ओरडत होता- बाजूला व्हा, बाजूला व्हा... हत्ती पिसाळला आहे. शिष्याला गुरूने सांगितलेली गोष्ट आठवली आणि तो रस्त्यामध्येच उभा राहिला.
शिष्याने विचार केला- माझ्याप्रमाणे हत्तीमध्येही देवाचा वास आहे. देवाला देवापासून काय भीती? असा विचार करून तो पूर्ण भक्ती आणि प्रेम भावाने रस्त्यामध्येच उभा राहिला.
हे पाहून माहूत मोठ्याने ओरडला- अरे बाजूला हो, का मृत्यूला आमंत्रण देत आहेस. तरीही शिष्य एक इंचही इकडे-तिकडे सरकला नाही आणि शेवटी जे घडायचे तेच घडले. पिसाळलेल्या हत्तीने शिष्याला सोंडेने उचलून रस्त्याच्या बाजूला फेकून दिले. बिचारा शिष्य वेदनेने ओरडू लागला.
त्याला जास्त त्रास या गोष्टीचा होत होता की, देवाने देवाला का मारले? त्याचे मित्र त्याला घेऊन आश्रमात आले. त्याने गुरूला विचारले- तुम्ही तर म्हणता प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे. पाहा, त्या हत्तीने माझी काय अवस्था केली.
गुरु म्हणाले- हो, प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहेच, निश्चितच हत्तीमध्ये देवाचा वास आहे आणि माहुतामध्येही देव आहे. तू माहुताने सांगितलेले का नाही ऐकलेस? देवानेच तुला ते सांगितले होते. शिष्याला त्याची चूक लक्षात आली.
लाईफ मॅनेजमेंट
आपण अनेक समस्यांचे समाधान देवावर सोडून देतो, परंतु थोडी बुद्धी वापरून आपणच त्या समस्यांवर मार्ग काढू शकतो. प्रत्येक वेळी पुस्तकी ज्ञानाची मदत घेण्याची आवश्यकता नाही. काही ठिकाणी प्रॅक्टिकलही व्हावे लागते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.