३ अपघातात ११ जणांचा मृत्यू; महूतील आंबेडकर जयंतीहून येताना कुटुंबाचा घात

पायी देवीभक्तांना क्रूझरने उडवले, ३ ठार, २ जखमी  
 

दिव्य मराठी

Apr 16,2019 10:27:00 AM IST


मेहकर -मध्य प्रदेशातील महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मस्थानी जयंती साजरी करून परत येणाऱ्या कुटुंबावर सोमवारी त्यांच्या गावापासून हाकेच्या अंतरावर काळाने झडप घातली. बुलडाण्यातील अंजनी बुद्रुक गावाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत कुटुंबातील दोन्हीही कर्त्या पुरुषांसोबत ५ जणांचा बळी गेला.


ही घटना १४ एप्रिलच्या मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास घडली. मृतांत वर्षभराच्या मुलासह २ महिलांचा समावेश आहे. अपघातात स्काॅर्पिओचा समोरील भाग अक्षरश: चकनाचूर झाला होता, तर ट्रकची समोरील दोन्ही चाके निखळून पडली. स्काॅर्पिओचालक गोलू मनोहर जुमडे (२२), मनोहर कुंडलिक जुमडे (५०), वैजयंती श्रीरंग जुमडे (६०), कोमल विकी जुमडे (२२), राजरत्न विकी जुमडे (१) हे जागीच ठार झाले, तर प्रतीक संतोष जुमडे, ताई मनोहर जुमडे, विशाल खरात, कमल विश्वास जुमडे, स्नेहल इंगळे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


नंदुरबार- नवापूर तालुक्यातील वाटवी गावाजवळ रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर, कार व दुचाकीत झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर खांडबाराहून नंदुरबारकडे जात असताना त्याला कारने ओव्हरटेक केले. तितक्यात समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीवरील हरकलाल गांगुर्डे (४५), पुतणी दुर्गा भिल (१२) व मुलगी योगिता (सर्व रा. पळसून, ता. नवापूर) यांचा मृत्यू झाला. कारचालक तिथून फरार झाला. त्याच्या अटकेची मागणी करत मृतांच्या शेकडो नातेवाइकांनी नंदुरबार राज्य मार्गावर रास्ता रोको केला.कळवण- चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर पायी चालत जाणाऱ्या भाविकांना क्रूझरने दिलेल्या धडकेत ३ ठार, तर २ जखमी झाले. सोमवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. भाविक देवळा तालुक्यातील गुंजाळनगर, खालप परिसरातील होते. क्रूझरच्या धडकेत शुभम बापू देवरे (१६) हा जागीच ठार झाला, तर भाऊसाहेब पुंडलिक पवार (१५), कल्पेश रवींद्र सूर्यवंशी (२५) यांच्यासह अन्य दोन भाविक जखमी झाले.


त्यांच्यावर कळवणच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उपचारादरम्यान भाऊसाहेब आणि कल्पेश यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी कळवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

X