पुरातत्त्व / ठाणे परिसरात मृत खाडीच्या दलदलीत सापडल्या अकरा शिवकालीन तोफा

ठाणे मनपाकडून जतन-संवर्धनाचे प्रयत्न सुरू, दुर्गसंवर्धन समितीचा पुढाकार

दिव्य मराठी

Feb 19,2020 08:12:00 AM IST

जयश्री बोकील

पुणे - ठाणे खाडीच्या परिसरातील ठाणे किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात दलदलीत आणि कचऱ्याच्या ढिगात गाडल्या गेलेल्या तब्बल अकरा शिवकालीन तोफा सापडल्या आहेत. नऊ ते तेरा फूट लांबीच्या या तोफांचे वजन तीन ते सात टन (सात हजार किलो) एवढे आहे. सर्व तोफा सुस्थितीत असून ओतीव लोखंडापासून बनवण्यात आल्या आहेत. तोफांची स्थिती, धातू, चिन्हे, घडण यावरून या तोफा दोनशे ते चारशे वर्षे जुन्या असल्याचे निरीक्षण इतिहासतज्ज्ञांनी नोंदवले.


यासंदर्भात डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व अभ्यासक - संशोधक व राज्याच्या दुर्गसंवर्धन समितीचे माजी सदस्य डॉॅ. सचिन जोशी म्हणाले, ‘सहा महिन्यांपासून या तोफांच्या अस्तित्वाची माहिती समजली होती. मात्र, तोफा मोकळ्या करण्यासाठी पुरातत्त्व विभागासह इतर काही खात्यांची पूर्वपरवानगी आवश्यक होती. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यावर दुर्गसंवर्धन समितीचे माजी सदस्य आणि अन्य पाच संस्थांचे कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी एकत्रित प्रयत्न करून या अकरा तोफांचा खजिना सुरक्षितपणे बाहेर काढला. तोफा सुस्थितीत बाहेर काढण्यासाठी व नंतर त्या अवजड तोफा उचलून नव्याने उभारलेल्या ओट्यांवर लाकडी कोंदणात नेमक्या बसवण्यासाठी बराच वेळ लागला. जेसीबी मशिन्सचे साह्य घेतले गेले.’


डॉ. जोशी पुढे म्हणाले, ‘तोफा ठेवण्यासाठी ठाणे मनपातर्फे प्रत्येकी साडेतीन फुटांचा ओटा उभारून दिला. त्यावर लाकडी ठोकळ्यांत या तोफा योग्य पद्धतीने बसवण्यात आल्या आहेत. काही तोफांवर असलेल्या चिन्हांवरून त्या ब्रिटिश तसेच पोर्तुगीजांनी तयार केल्या असाव्यात, असाही अंदाज आहे. सुमारे दोनशे वर्षांपेक्षा अधिक काळ गाडलेल्या अवस्थेत असल्याने तोफांची साफसफाई व शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन-संवर्धनही पूर्ण करण्यात आले आहे.’


तोफांच्या जतन व संवर्धनासाठी पाच संस्थांचे सहकार्य

तोफांच्या जतन व संवर्धनासाठी पाच संस्थांनी काम केले. त्यात दुर्गवीर प्रतिष्ठान, दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट, चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट, कोकण इतिहास परिषद आणि राजे सामाजिक प्रतिष्ठान, चिपळूण यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा समावेश होता. विरार, पालघर येथूनही काही स्वयंसेवक आले होते.
- डॉ. सचिन जोशी, माजी सदस्य, राज्य दुर्गसंवर्धन समिती

X