आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकॉकमध्ये प्रदूषणाची आणीबाणी; विषारी हवेमुळे शहरातील शाळा बंद, घरातच राहण्याचा नागरिकांना सल्ला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये प्रदूषणाचा कहर झाला असून त्यामुळे आणीबाणी निर्माण झाली आहे. एक आठवड्यापासून विषारी धूर पसरला आहे. शहरातील ४०० हून जास्त शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मास्क परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.

 

प्रदूषणापासून सुटका करून घेण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. धूर व धुके घालवण्यासाठी विमान व ड्रोनद्वारे पाण्याचा शिडकावा करण्यात आला. डिझेल गाड्यांवर बंदी आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. चीनमधून येणारी विषारी हवा प्रदूषण आणीबाणीस कारणीभूत ठरली आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.थायलंडचे राष्ट्रीय विकास प्राधिकरणचे संचालक प्रोफेसर सिवाट यांच्या मते, बँकॉकच्या हवेत विषारी घटक कॅडमियम, टंगस्टनची पातळी ९ टक्क्यांनी वाढली आहे. प्रदूषणापासून सुटका मिळवण्यासाठी 'बिग क्लीनिंग' अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत सोमवार ते बुधवारपर्यंत शहर व परिसरातील २५०० कारखाने कार्बन उत्सर्जनाला रोखण्यासाठी यंत्रांची सफाई मोहीम हाती घेतील. उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होणार आहे. 

 

१९५२ : ४ हजार मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये हवेसंबंधी झाला कायदा 
१९५२ मध्ये विषारी हवा तयार झाल्यानंतर लंडनमध्ये काही आठवड्यांत ४ हजारांवर लोकांना प्राण गमावण्याची वेळ आली होती. त्यानंतर जगभरात पर्यावरण संशोधन व आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू झाला. त्यानंतर ब्रिटन सरकारने पर्यावरणाशी संबंधित कायदा केला. त्यानुसार हवेतील शुद्धतेची पातळीबद्दल जनजागृती सुरू केली. १९५६ मध्ये ब्रिटनमध्ये क्लिन एअर अॅक्ट लागू झाला. पर्यावरणाच्या सुरक्षेवर कामही सुरू झाले. कोळशापासून वीज वापरावरही बंधन आणली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...