आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीचा कलंक न मिटणारा : मोदी, लोकसभेतील भाषणात पंतप्रधानांचे काँग्रेसवर टीकास्त्र 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंगळवारी उत्तर दिले. या वेळी मोदी यांनी काँग्रेसवर खरमरीत टीकास्त्र सोडले. आणीबाणीवरून काँग्रेस नेत्यांवर असलेल्या आरोपांचा थेट उल्लेख टाळत शेलक्या शब्दांत मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. 


मोदींनी कोटी केली की, तुम्ही एवढ्या उंचीवर पोहोचलात की जमिनीवरील लोकांना तुच्छ समजता आहात. ही उंची तुम्हाला लखलाभ, आमचे स्वप्न तळागाळापर्यंत पोहोचण्याचे आहे. पंतप्रधानांनी मागील सरकारच्या योगदानाचा विसर पडल्याच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी काँग्रेसवर आरोप केला की, हा पक्ष कुटुंबाबाहेर पाहतच नाही आणि गांधी कुटुंबाशिवाय कोणाची स्तुतीदेखील करत नाही. मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचाही उल्लेख करत म्हटले की,  आम्ही कोणालाही कमी लेखत नाही. आम्ही आमची प्रगती रेषा उंचावण्यासाठी मेहनत घेत आहोत, इतरांच्या रेषा छोट्या करण्यात आम्हाला रस नाही.  


तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सुमारे १३ तास चाललेल्या चर्चेत लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष भले कमकुवत झाला असेल, मात्र तो आपली उंची कमी होऊ देणार नाही. विरोधकांनी मोदी सरकारवर प्रखर राष्ट्रवादाच्या प्रसारातून देशाचे विभाजन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत घटना धोक्यात असल्याचे म्हटले होते. 


काँग्रेसने अटलजींच्या चांगल्या कामाचे काैतुक केले नाही : माेदी यांनी आधीच्या सरकारांचे याेगदान न मानण्याच्या आराेपावर उत्तर देत सांगितले की, २००४ च्या आधी देशात वाजपेयी सरकार हाेते. २००४ पासून २०१४ पर्यंत सरकारमध्ये बसलेल्या लाेकांनी सरकारी कार्यक्रमांत अटलबिहारी वाजपेयी यांचे काैतुक केले की नरसिंह राव सरकार अथवा आताच्या भाषणांत काेणी मनमाेहन सिंग यांचे नाव घेतले ते सांगा.


‘त्या’ रात्री देशाचा आत्मा तुडवला
पंतप्रधान म्हणाले, लोकांना माहिती आहे की २५ जूनला काय आहे? २५ जूनच्या त्या रात्री देशाच्या आत्माला तुडवण्यात आले होते.  भारतात लोकशाही घटनेच्या पानांतून निर्माण झालेली नाही. भारतात पिढ्यान् पिढ्या लोकशाही सर्वांच्या आत्म्यातच आहे. त्या वेळी प्रसारमाध्यमांची गळचेपी केली होती, महापुरुषांना तुरुंगात गजाआड पाठवण्यात आले होते. देशाचे कारागृह करण्यात आले होते. सत्ता हातून जाऊ नये यासाठी हे करण्यात आले होते. न्यायसंस्थेचा अवमान कसा होतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. २५ जूनला आम्ही लोकशाहीप्रतक संकल्प करतो आहोत.  त्या वेळच्या पापाचे जे भागीदार होते, त्यांनी लक्षात घ्यावे की हा कलंक मिटणार नाही.


‘आंबेडकरांच्या नावाचीही चर्चा झाली असती तर बरे झाले असते ’ : माेदी म्हणाले, आधीच्या सरकारांनी काम केले नाही, असे नव्हे, मात्र आंबेडकरांच्या नावाचाही संसदेत उल्लेख झाला असता तर बरे झाले असते. देशात पाण्याबाबत जेवढा काही पुढाकार घेतला गेला ताे बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. मात्र, खूप उंचीवर गेल्यावर काही दिसत नाही.