आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Emphasis On Public Relations Campaign Of Leaders, Aspirants In Latur District For Assembly Elections

विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात नेते, इच्छुकांचा जनसंपर्क अभियानावर भर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होणार असल्याचे लक्षात घेऊन गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वपक्षीय विद्यमान आमदार आणि संभाव्य इच्छुकांनी जनसंपर्क अभियानावर भर दिला आहे. जाती-धर्मांचे मेळावे, बैठका घेणे, नारांजांचे रुसवे फुगवे काढणे, आपली व्होटबँक मजबूत करणे, विरोधकांची मते खाण्यासाठी कुणाला उभा करता येईल काय याची चाचपणी घेणे अशा पद्धतीची व्यूहरचना नेत्यांकडून केली जात आहे.

लातूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औसा हे तीन काँग्रेसकडे तर उदगीर, अहमदपूर आणि निलंगा हे भाजपकडे आहेत. त्यामध्ये अनुक्रमे आमदार अमित देशमुख, त्र्यंबक भिसे आणि बसवराज पाटील हे काँग्रेसचे तर सुधाकर भालेराव, विनायक पाटील आणि संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे आमदार आहेत. त्यातील लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे वगळता सर्वच ठिकाणच्या विद्यमान आमदारांनी पुन्हा निवडून येण्यासाठी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. भिसे यांना उमेदवारीची शाश्वती नसल्यामुळे ते जनसंपर्क अभियानाच्या फंद्यात पडलेले नाहीत.

लातूर शहर मतदारसंघात आमदार अमित देशमुख यांनी गेल्या महिनाभरापासून जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. दररोज शहराच्या एका भागात जाऊन पदयात्रा काढणे, त्या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी भेट देऊन संवाद साधणे, तेथील कार्यकर्त्यांच्या घरी नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करणे यामाध्यमातून अमित देशमुख संपर्क करीत आहेत.त्याचबरोबर नगरसेवक, आमदार फंडातील कामांचे भूमिपूजन करण्याचाही सपाटा त्यांनी लावला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आहेत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर. त्यांनीही गेल्या महिनाभरापासून मतदारसंघात तळ ठोकला असून काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचणे, विकासकामांचे भूमिपूजन उरकणे, पूर्ण झालेल्या कामांची उद्घाटने करणे, गावोगावी भेट देऊन लोकांच्या भेटी गाठी घेण्यावर त्यांचा जोर आहे. मंत्रिपदामुळे संभाजी पाटील यांना मुंबईसह राज्यभरात वेळ द्यावा लागला. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात पूर्वीसारखा संपर्क राहिला नाही. त्यांच्या ऐवजी लहान भाऊ अरविंद पाटील यांनी मतदारसंघावर चांगलीच पकड निर्माण केल्याचे दिसत आहे. त्याचा फायदा संभाजी पाटील यांना होत आहे. निलंग्यात भाजपकडे त्यांच्याशिवाय कुणीच उमेदवारी मागितलेली नसल्यामुळे त्यांना पक्षांतर्गत कुणीही स्पर्धक नाही. 

उदगीर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षांत मतदारसंघावर चांगली पकड निर्माण केली आहे.  त्यांनीही वेगळे असे अभियान राबवलेले नाही. परंतु विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या माध्यमातून तेही मतदारांशी संपर्क करीत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनी गेल्या सहा महिन्यांत जोरदार तयारी केली होती. परंतू ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्षाला लागलेल्या घसरणीमुळे संजय बनसोडे काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. मात्र त्यांनी यावेळी निवडणूक जिंकायचीच असा पण केला आहे. एमआयएमचे ताहेर हुसेन यांनी येथून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे.
 

अहमदपूरमध्ये चुरस :
सर्वाधिक चुरस अहमदपूर मतदारसंघात अाहे. गेल्या वेळी अपक्ष निवडून आलेले विनायक पाटील काही महिन्यांतच भाजपत सामील झाले. मात्र त्यांचे भाजपत जुळले नाही. पाटील यांच्या ऐवजी आपल्याला उमेदवारी मिळावी असे वाटणारे गणेश हाके, दिलीप देशमुख, अशोक केंद्रे असे अनेक नेते अहमदपूरमध्ये आहेत. त्यामुळे भाजपत एकमेकांवर कुरघोडी सुरू आहेत. त्याचा फायदा तेथील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार बाबासाहेब पाटील यांना होण्याची चिन्हे आहेत. बाबासाहेब पाटील यांचा गेल्यावेळी पराभव झाला होता. 
 

औशातून स्वीय सहायक अभिमन्यू पवारांनी लावला जाेर
औसा मतदारसंघ सध्या चर्चेत अाला तो मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यामुळे. पवार यांनी येथून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या दौऱ्यात अभिमन्यू पवारांना ताकद द्या, असे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून अभिमन्यू पवार यांनी या मतदारसंघात संपर्क अभियान राबवले आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल ३५० कोटींहून अधिक रुपयांच्या योजना मतदारसंघात आणल्या आहेत. मात्र ते उपरे असल्याचा आरोप करीत भाजपतीलच काही जणांनी त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. जि. प.चे विद्यमान अध्यक्ष मिलिंद लातुरे, कृषी सभापती बजरंग जाधव, औशाचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांनी पवार विरोधाचा अजेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. त्यांना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांची मदत असून कोणत्याही परिस्थितीत पवारांना उमेदवारी मिळणार नाही आणि मिळालीच तर त्यांना निवडून येऊ द्यायचे नाही, अशी व्यूहरचना करण्यात आली आहे. मुळात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे तेथून माजी आमदार दिनकर माने यांनीही तयारी केली आहे. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार बसवराज पाटील जातीय गणिते आखत तेथून दावेदारी करीत आहेत. मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे हेही  उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
 

आमदार त्र्यंबक भिसेंचे देऊळ पाण्यात
लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे ते कमालीचे शांत आहेत. या मतदारसंघातून विलासरावांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख उत्सुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी काका दिलीपराव देशमुखांनीच फिल्डिंग लावली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक गावातील लोकांशी संपर्क केला जात असून धीरज यांना निवडून आणण्याचा निरोप दिला जात आहे. मात्र त्यांच्याविरोधात भाजपच्या रमेश कराड यांचे जोरदार आव्हान आहे. सलग दोन वेळा पराभूत होऊनही उमेद कायम राखत रमेश कराड यांनी दहा वर्षांपासून या भागात आपला संपर्क कायम ठेवला आहे. देशमुखांकडून कोणाचाही संपर्क नसल्यामुळे निर्माण झालेली पोकळी रमेश कराडांनी भरून काढली आहे. पंकजा मुंडेंच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत.