आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरे उद्योगातून बेरोजगारांच्या हाताला मिळणार काम: राज्यमंत्री संजय राठोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेर- फल्ली तेल, चामडी चप्पल, दालमिल यासाठी प्रसिद्ध असलेले नेर शहर आता हिरे उद्योगाचे शहर म्हणून नावलौकीक मिळवेल असा विश्वास व्यक्त करतानाच या उद्योगामुळे तालुक्यात रोजगाराला चालना मिळेल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हिऱ्यांना पैलू पाडणारा विदर्भातील पहिला उद्योग नेरमध्ये कार्यान्वित झाला. मातोश्री डायमंड इन्स्टिट्यूट या नावाने या उद्योगाचे औपचारिक उद्््घाटन गुरूवारी ना. संजय राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेरच्या नगराध्यक्षा वनिता मिसळे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, बाबू पाटील जैत, नामदेवराव खोब्रागडे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे, सुरत येथील हिरे व्यापारी हिम्मतभाई मंगोकीय, शैलेशभाई, कवलजीत सिंग आदी उपस्थित होते. 


नेरमध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगाची मुहूर्तमेढ कशी झाली यासंदर्भात बोलताना ना. संजय राठोड म्हणाले, नेर, दारव्हा, दिग्रस तालुक्यातील बहुतांश तरूण गुजरातमधील सुरत, गांधीनगर, अहमदाबाद आदी शहरांमध्ये असलेल्या हिरे उद्योगात रोजगारासाठी गेले आहेत. हे तरूण रोजगारासाठी परराज्यात असल्याने इकडे त्यांचे कुटुंबीय एकटे पडले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी आपण गुजरातमध्ये स्थलांतरीत झालेल्या तिन्ही तालुक्यातील कामगारांचा सुरत येथे स्नेहमिलन सोहळा घेतला. यावेळी अनेक तरूणांनी गावात रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही, असे सांगितले. याच भेटी दरम्यान गुजरातमधील काही हिरे व्यापाऱ्यांचीही भेट घेतली. त्यांच्याशी जिल्ह्यात हिऱ्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करण्यासंदर्भात चर्चा केली. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास गुजरातमधून कच्चा माल पाठवून या ठिकाणी हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या उद्योगाची निर्मिती करण्याबाबत या व्यापाऱ्यांनी सहमती दाखवली. त्याचा पाठपुरावा करून पहिला हिरे उद्योग नेर येथील सहारा नगरमध्ये कार्यान्वित होत असल्याने आनंद आणि समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 


नेर येथे आपण नुकतीच एमआयडीसी मंजूर करवून घेतली. या औद्योगिक क्षेत्रात सर्व प्रकारचे मोठे उद्योग यावेत यासाठी आता आपले प्रयत्न आहेत. नेर शहर महामार्ग आणि लोहमार्गाच्या जवळ असल्याने शहरात येत्या काळात अनेक उद्योग स्थिरावतील व येथील बेराजगारांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ना. संजय राठोड यांच्यासह उपस्थितांनी मातोश्री डायमंड इन्स्टिट्युटची पाहणी करून हिऱ्यांना पैलू कशा पद्धतीने पाडतात याची माहिती करवून घेतली. उपस्थित कामागारांनी मन लावून काम करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाला जि. प. सदस्य भरत मसराम, मुख्याधिकारी नीलेश जाधव, भाऊराव ढवळे, माया राणे, संध्या चिरडे, रश्मी पेठकर, किसन राठोड महाराज, रविकिरण राठोड, सुनील राठोड, संदीप पाटील आदी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...