आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरोडेखोर व पोलिसांत चकमक, गंगापूर तालुक्यातील भेंडाळ्याजवळ घडली थरारक घटना

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांकडून हवेत गोळीबार; दगडफेकीत पोलिस निरीक्षक जखमी, एकाला अटक

गंगापूर- औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळ्याजवळ १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोर व गंगापूर पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या वेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमध्ये पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे जखमी झाले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास महामार्गावर पाच दरोडेखोर घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या हेतूने फिरत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या पथकावर दगडफेक करून हल्ला चढवला. या वेळी पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना दगडाचा मार लागल्याने ते जखमी झाले. त्यामुळे सुरवसे यांनी त्यांच्या सर्व्हिस पिस्टलमधून दोन राउंड हवेत गोळीबार केल्यानंतर दरोडेखोरांनी मिळेल त्या दिशेने पळायला सुरुवात केली. त्यातील एक दरोडेखोर गंगापूरकडे जाणाऱ्या अंतापूर शिवाराच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या वेळी अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव अमोल सोपान पिंपळे (१९) असून त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या इतर साथीदारांची नावे दादा गोविंद साळुंके (रा. खोकर), साजन पवार (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर), आदित्य शामराव पवार (गुरुधानोरा, ता. गंगापूर) व सागर अशी आहे. आरोपीकडून दोन चोरीच्या मोटारसायकल, एक सत्तूर, दोर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक एम.डी सुरवसे यांच्यासोबत पीएसआय अर्जुन चौधर, पीएसआय रामहरी चाटे, पोहेका जितेंद्र बोरसे, विजय भिल्ल, भागचंद कासोदे, बंडू कुचेकर, चालक दत्तात्रय गुंजाळ व चालक शेख रिझवान इब्राहिम यांनी सहभाग घेतला.

कायगावला हवी कायमस्वरूपी पोलिस चौकी


औरंगाबाद व नगर जिल्ह्याची हद्द कायगाव येथील गोदावरी पुलावर असून गुन्हेगार कायगाव ते लिंबेजळगावदरम्यान गुन्हे करून नगर जिल्ह्यात पळून जातात, असे आजपर्यंतच्या घटनांवरून दिसते. त्यामुळे जुने कायगाव येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी व याच महामार्गावर रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत गस्तीपथक, दररोज वाळूज, गंगापूर व नेवासा पोलिसांमध्ये समन्वय असेल तरच वरील घटनांना आळा बसू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कायगाव ते लिंबेजळगाव दरोडेखोरांचा अड्डा
 
मागील सहा महिन्यांमध्ये दरोडेखोरांनी औरंगाबाद-नगर महामार्गावर कायगाव ते लिंबेजळगावदरम्यानचा रस्ता व कायगाव परिसरातील शेतवस्त्यांना लक्ष्य केल्याचे दिसत असून या काळात दरोडे व वाहने अडवून लूटमारीच्या अनेक घटना घडल्या. प्रत्येक घटनेत दरोडेखोर नवनवीन क्लृप्त्या वापरून गुन्हे करीत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आतापर्यंत दोन-तीन प्रकरणांतच दोन-तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दरोडेखोरांना कायमस्वरूपी धाक बसेल अशी यंत्रणा असणे गरजेचे आहे.