आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Encounter Can Not Stop The Crime Happened With Women; Women's Union Letter To The Court

महिला अत्याचार एन्काउंटरने थांबणार नाहीत; महिला संघटनांचे कोर्टाला पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : 'आरोपींना लोकांच्या हवाली करा, आरोपींना दगडाने ठेचून मारा' या काही जणांनी केलेल्या जाहीर वक्तव्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांनी महिला व्हेटर्नरी डाॅक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचे एन्काउंटर केले, असा ठपका हैदराबादमधील काही महिला हक्क संघटनांनी ठेवला आहे. तेलंगण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून या पूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. या एन्काउंटप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होईल.

महिलांवरील अत्याचार एन्काउंटरने थांबणार नाहीत तर कायद्याच्या चौकटीतील उत्तरानेच ते थांबणार असल्याची भूमिका घेऊन हैदराबामधील महिला संघटनांनी तेलंगण उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलगी अडचणीत असल्याची या महिला डाॅक्टरच्या कुटुंबाची तक्रार गंभीरपणे घेऊन पोलिसांनी त्वरित कारवाई केली असती तर तिचा जीव वाचू शकला असता, असे या संघटनांचे म्हणणे आहे. महिलांवरील अत्याचार अशा एन्काउंटरने नाही तर लोकशाही चौकटीतील कायद्याची अंमलबजावणीने थांबतील. आपले कुटुंब, समाज, शाळा, कॉलेजेस, कार्यालये आणि परिसर या सर्व पातळ्यांवर मोठी लढाई द्यावी लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. उस्मानिया विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापिका पद्मा शॉ, मीरा संघमित्रा, प्रोग्रेसिव्ह आॅर्गनायझेशन फाॅर वुमेन या संघटनेच्या जानसी, संध्या व्ही., प्रोग्रेसिव्ह वुमेन रायटर्स असोसिएशनच्या विजया भंडारू आणि महिला हक्क संघटनेच्या विमला मोरथाला यांनी हे पत्र पाठवले आहे. या प्रकरणाचे पडसाद अस्वस्थ करणारे आणि भीतीदायक असल्याच्या प्रतिक्रिया महिला चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. व्ही. सी. सज्जनार यानी २००८ मध्ये अशाच प्रकारे अॅसिड हल्ले करणाऱ्यांचे एन्काउंटर केल्यावर अॅसिड हल्ले कमी झाल्याचे सांगितले जाते. मात्र त्यात तथ्य नसून आजही ग्रामीण तेलंगणमध्ये मोठ्या प्रमाणात हे हल्ले सुरू असल्याचे मत अॅसिड सर्व्हायव्हर्ससोबत काम करणाऱ्या तेजस्विनी यांनी व्यक्त केले. एन्काउंटरचे समर्थन करणाऱ्यांमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले अनेक जण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टोकाच्या प्रतिक्रिया समाजासाठी धोकादायक

एनकाउंटरनंतर दोन टोकावर समाज दुभंगला गेला आहे. पोलिसांच्या कृत्याची सत्य-असत्यता कोर्टात सिध्द होईल. मात्र, या घटना रोखण्यात पोलिसांची भूमिका आणि समाजाची मानसिकता यावर कुणाला काही बोलायचे किंवा ऐकायचे नाही. विशेष म्हणजे महिलाही कायद्याच्या आधारापेक्षा या फसव्या कृत्याला न्याय समजू लागल्या आहेत. महिला चळवळीपुढे हे मोठे आव्हान आहे. - उषा रावेरी, लेखिका
 

बातम्या आणखी आहेत...