Crime / पोलिसांच्या हाय अलर्टनंतरही नक्षल्यांचा दहशतीचा प्रयत्न; बीट जाळून, झाडे आडवी टाकत वाहतूक राेखली

घटनेच्या निषेधार्थ १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे नक्षलवाद्यांनी केले होते आवाहन 

दिव्य मराठी

May 20,2019 09:43:00 AM IST

नागपूर - रविवारी केलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत नक्षल्यांनी पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी (चिपरी) येथील वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा येथे रोलर जाळला. तर एटापल्ली व भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


२७ एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा या ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केले, असा आरोप नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांमधून केला आहे. शिवाय या घटनेच्या निषेधार्थ १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी रविवारी पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी (चिपरी) येथील जंगलात वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली. घटनास्थळ पुराडा वनपरिक्षेत्रातील असून जंगल कामगार सहकारी संस्थांनी येडापूर व कुरंडी कुपातील लाकडे तोडून ती वारवी येथील जंगलात ठेवली होती. मात्र, नक्षल्यांनी ती जाळून टाकल्याने वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रक व बॅनर लावून त्यावर बिट कटाई करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना हाकलून लावा, जल, जंगल व जमिनीवर जनतेचा अधिकार आहे, असा मजकूर लिहिला आहे.

X