आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दशकांनंतर हुतात्मा स्मारक व ध्वजस्तंभाने घेतला मोकळा श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- शहरातील खर्डा चौक ते तपनेश्वर रोड स्मशानभूमी या रस्त्यावरील २६, बाजारतळावरील २४ अनधिकृत टपऱ्यांवर बुधवारी अतिक्रमण विरोधी पथकाने हटवली. विशेष म्हणजे ४० वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले हुतात्मा स्मारक व ध्वजस्तंभ मोकळे झाले. अतिक्रमण काढत असताना भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप करताना दुजाभाव केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, असे असताना प्रथमच शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. 


अमरधाम रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे व जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिक, सामाजिक संघटनांनी अनेक वेळा लेखी तोंडी मागण्या केल्या होत्या. हा रस्ता १२ मीटर असून दोन्ही बाजूने गटार व फूटपाथ आहे. या रस्त्यावरील गटाराचे काम सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी या रस्त्यासाठी ४ कोटी २६ लाख इतका निधी मंजूर करून दिला आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही अतिक्रमणांमुळे संबधित ठेकेदाराला काही काळ काम करता आले नाही. 


बुधवारी सकाळी १० वाजेपासूनच पोलिस बंदोबस्तात काढण्यास सुरुवात केली होती. प्रथम स्मशानभूमीकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. माजी सरपंच कैलास माने यांच्या इमारतीचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करताना भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी १२ मीटरपर्यंतची खूण केली होती. परंतु याच अधिकाऱ्यांनी घूमजाव करत रस्ता वाकडा असल्याचे भासवून ११ मीटरवर मोजमाप केले. या वेळी अर्धा तास नागरिक व प्रशासनात शाब्दिक बाचाबाची झाली. भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेमुळे नेमके पाणी कुठे मुरत आहे, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर अतिक्रमण काढण्यास पुन्हा सुरुवात झाली. मोहीम मारुती मंदिराजवळ आल्यानंतर मंदिरासमोरील अतिक्रमण राजकीय दबावापोटी काढले जात नाही, अशी नागरिकांनी तक्रार केली. 


इमारतीचे अतिक्रमण काढले जाऊ नये यासाठी काही नगरसेवक व अधिकाऱ्यांचे हात ओले झाले असल्याची चर्चा आहे. याची माहिती घेतली असता या प्रकरणी संतोष पवार यांनी भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीबाबत तक्रार अर्ज केला आहे यावर भूमी अभिलेख कार्यालयाने तक्रार अर्जाप्रमाणे सिटी सर्व्हे नंबर २१४५ ची मोजणीची नोटीस हद्दी खूण दाखवली असून याची खात्री पडताळणी करणे आवश्यक आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही करता येईल, असे लेखी पत्र भूमी अभिलेखचे उपाधीक्षक यांनी नगरपरिषदेला दिले आहे त्यामुळे या इमारतीची कारवाई थांबवली. अतिरिक्त बंदोबस्तात एसआरपीची तुकडी पोलिस निरीक्षक १ सहायक पोलिस निरीक्षक १ पोलिस उपनिरीक्षक २ व पोलिस कर्मचारी ७० तैनात होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेला १९८० पासून अतिक्रमणांच्या विळख्यात पडलेले ध्वजारोहण स्तंभ व हुतात्मा स्तंभ आज मोकळे झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...