आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide: IT कंपनीत झाली होती निवड; पण मित्र मैत्रिणींना दूर केल्याने होती तणावात; औरंगाबदच्या JNEC मध्ये इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद - अभियांत्रिकीच्या (कॉम्प्युटर सायन्स) चाैथ्या वर्षात शिकणारी गौरी सुशील खवसे (२३, रा. मधुराज हाउसिंग सोसायटी, गारखेडा) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास आई तिला उठवण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. एका नामांकित आयटी कंपनीत मुलाखतीद्वारे तिची निवड झाली हाेती. येत्या काही दिवसात तिला ऑफर लेटर मिळणार होते. महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमधून वेगळे केल्याने तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

 

गौरी ही जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेएनईसी) संगणकशास्त्राच्या अंतिम वर्षात शिकत होती. अभ्यासात हुशार असलेल्या गौरीचे वडील महावितरणमध्ये अधिकारी असून भाऊ सौरभ जर्मनीत नोकरी करतो. गौरीचा एका सत्राच्या एक विषयाचा निकाल राखीव राहिला होता. त्यामुळे देखील ती तणावाखाली गेली. परंतु कुटुंबाने तिला धीर देत समजावून सांगितले होते. तिने त्या विषयाचा पुन्हा अभ्यास करून फेर परीक्षा दिली होती. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून आई-वडिलांसोबत जेवण केले. रात्री साडेअकरा वाजता सर्वजण खोलीत झोपण्यासाठी गेले. तिने वडिलांचा लॅपटॉप सोबत नेला होता. सकाळी सात वाजता तिची आई उठवण्यासाठी गेली असता गौरीने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाइकांच्या मदतीने तिला घाटीत दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीत गौरीचा मृत्यू मध्यरात्री एक ते अडीचच्या दरम्यान झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार फरताळे तपास करत आहेत. 

 

आयटी कंपनीत निवड झाली होती : 
गौरीची कॅम्पस मुलाखतीतून टाटा कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस (टीसीएस) या नामांकित कंपनीत निवड झाली हाेते. तिला जुलैमध्ये ऑर्डर मिळणार होती. परंतु मागील काही दिवसांपासून ती प्राेजेक्ट, परीक्षेमुळे तणावात होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण सांगता येणार नसल्याचे कुटुंबाने पोलिसांना सांगितले. परंतु मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपकडून तिला सहकार्य मिळणे अचानक थांबल्याने तिला वाईट वाटत होते, अशी माहिती कुटुंबीयांकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 


लॅपटॉप मधून माहिती मिळण्याची शक्यता 
पोलिसांना तिच्या खोलीत लॅपटॉप आढळला. त्यात तिने काही मजकूर लिहून ठेवला आहे का, याची तपासणी पोलिस करत आहेत. त्यातून पुरावे मिळण्याची शक्यता असून सायबर पोलिसांच्या मदतीने लॅपटॉप तपासण्यात येणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...