अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला खासगी / अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला खासगी बसने चिरडले; मदतीऐवजी नागरिक घेत होते मोबाइलमध्ये फोटो

प्रतिनिधी

Feb 28,2019 02:14:00 PM IST

औरंगाबाद- मध्यवर्ती बसस्थानकात मित्राला सोडून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव खासगी बसने चिरडले. यात अभियांत्रिकीचा विद्यार्थी अशोक रंगनाथ महाडिक (२२) हा जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र पवन राजेंद्र कापडे (२२, दोघेही रा. गजानन कॉलनी, पुंडलिकनगर) हा गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील हिंदू राष्ट्र चौकात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसचालक पसार झाला. अपघात एवढा भीषण होता की, बसच्या चाकाखाली दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला.

अशोक महाडिक हा शरदचंद्र पॉलिटेक्निक महाविद्यालयात मॅकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. त्यात परिसरात वास्तव्य करणारा विशाल उम्मीनवाडे हा पुण्यात शिक्षण घेतो. सुटीवर आलेला विशाल मंगळवारी रात्री पुण्याला ‍निघणार होता. रात्री दहाच्या सुमारास अशोक आणि पवन हे दोघे विशालला सोडण्यासाठी दुचाकीवर मध्यवर्ती बसस्थानकावर गेले होते. विशालला बसमध्ये बसवून दोघेही घराच्या दिशेने परत निघाले. घरापासून हाकेच्या अंतरावर पुढे गारखेड्यातून ते हिंदू राष्ट्र चौकाकडे निघाडे. या वेळी विजयनगरकडून धूत ट्रान्समिशनची कामगारांची वाहतूक करणारी बस आली व तिने थेट अशोकच्या दुचाकीला धडक‍ दिली. यात मोठा आवाज झाला. दुचाकी थेट बसच्या खाली येऊन अशोक व पवन गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात दुचाकी थे बसल्या चाकाखाली गेल्याने तिचा चुराडा झाला. अशोक आणि पवनला परिसरातील नागरिकांनी तातडीने हॉस्पिटलला हलविले. मात्र, अशोकला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पवन गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघातानंत गडबडीचा फायदा घेऊन बसचालक पसार झाला आहे.

जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात स्थानिक
हिंदू राष्ट्र चौक परिसरात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले. या गुळगुळीत रस्त्यावरून पाण्याचे टँकर, चारचाकी बस प्रचंड वेगात जातात, असे चौकातील रिक्षाचालक व नागरिकांनी सांगितले. वळण घेण्याच्या ठिकाणी व चौकामध्ये एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेकदा जीव मुठीत घेऊन जावे लागते, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
लाल रंगात दर्शवलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. काही दिवसांपूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण झाले. परंतु, गतिरोधक नसल्याने या चौकात लहान-मोठे अपघात होत आहेत.

मदतीऐवजी कामगार घेत होते मोबाइलवर फोटो
अपघातानंतर चालक पळून गेला अन् बसमधील काही कामगार दोघांना उचलण्याऐवजी मोबाइलवर छायाचित्र काढत होते, असे वैभव मिटकर यांनी सांगितले. हे पाहताच 'छायाचित्र काय काढता?' असे म्हणून त्यांनी दोघांना रुग्णालयात नेण्यास प्राधान्य दिले. यात पवनला वाचवण्यात यश आले, तर गंभीर इजा झाल्याने अशोकचा मृत्यू झाला. अपघातानंतर फोटो काढण्यापेक्षा जखमींना मदत करा, असे आवाहन मिटकर यांनी केले.

X
COMMENT