आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या दबावापुढे इंग्लंड झुकले, ट्रॅफर्ड मैदान झाले आता नो फ्लाय झोन घोषित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन  - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दबावापुढे अखेर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) झुकावे लागले. मंगळवारी भारत-न्यूझीलंड सामन्याच्या वेळी विमानाने भारतविरोधी बॅनर्स फडकावण्याचा प्रकार थांबावा म्हणून ब्रिटनने ओल्ड ट्रॅफर्ड मैदान व परिसर सामन्याच्या दरम्यान नो फ्लाय झोन जाहीर केला. ईसीबीने भारतीय क्रिकेट मंडळास ही माहिती कळवली. ६ जुलै रोजी हेडिंग्लेमध्ये भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान मैदानावरून पाच वेळा विमान गेले. या विमानावर भारतविरोधी बॅनर्स होती. यात काश्मीरचे स्वातंत्र्य व मॉब लिंचिंगचे उल्लेख होते. यावर बीसीसीआयने तीव्र आक्षेप घेतला होता. 


यापूर्वी वेस्ट यार्कशायर पोलिस सुपरिंटेंडंट स्टीव्ह कॉटर यांनी या हवाई मेसेजिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. ब्रिटिश नागरिकांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘प्रायव्हेट फ्लाय’ कंपनीचीही हीच भूमिका होती. कंपनीचे म्हणणे होते की, ६०० युरो (सुमारे ४२ हजार रुपये) देऊन कोणीही विमान किरायाने घेऊ शकते. 


वास्तविक हेडिंग्ले पूर्वीपासूनच भारतविरोधी निदर्शनाचे केंद्र आहे. येथे व्याप्त काश्मीरमधील सर्वात मोठे शहर असलेल्या मीरपूरचे सर्वाधिक नागरिक राहतात. सामन्यांदरम्यान राजकीय विरोध-निदर्शने येथे नवी नाहीत. येथून काही किमी अंतरावर ब्रॅडफोर्ड भाग आहे. तो ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश लोक मीरपूरचे आहेत. येथे १९८९ मध्ये सिटी हॉलसमोर मुस्लिमांच्या एका गटाने सलमान रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ कादंबरीच्या प्रती जाळल्या होत्या. आता यातील काही लोक क्रिकेटच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्यावर भारताला विरोध करत आहेत. एवढे असूनही आयोजक सामन्यासाठी हेच मैदान निवडतात कारण येथे क्रिकेटवेडे प्रेक्षक प्रचंड प्रमाणात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही (आयसीसी) भारताचा प्रत्येक सामना पाहणारे येथे हजारो प्रेक्षक असतील, याची जाण आहे. म्हणूनच भारताचे बहुतांश सामने भारतीय जेथे अधिक आहेत अशा ठिकाणीच खेळवले जातात. यामुळेच नॉटिंगहॅमचे टेंटब्रिज आणि बर्मिंगहॅमचे एजबेस्टनमध्ये सामने ठेवण्यात आले. याच पद्धतीने याॅर्कशायर व लँकेशायरमध्ये बहुतांश पाकिस्तानी राहतात. हे लोक भारताचे सामने आवडीने पाहतात. म्हणूनच याॅर्कशायरच्या हेडिंग्लेमध्ये भारताचे सामने ठेवले आहेत.
 

 

तिरंगा, गांधी टोप्या आणि पगडीच्या विक्रीतून मिळते उत्पन्न 
ब्रिटनमध्ये भारतीय सर्वात यशस्वी तसेच आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानी नागरिकांपेक्षा संपन्न आहेत. चालू विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीयांनी ३००० पौंड (सुमारे ३ लाख रु.) खर्च करून सामने पाहिले आहेत. ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानी प्रेक्षकांच्या तुलनेत भारतीयच जास्त होते. जगभरातील भारतीय हा सामना पाहण्यासाठी आले होते. आयसीसी नेहमीच भारताच्या समर्थकांच्या बाजूने निर्णय घेते, अशी तक्रारही करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये असे आयोजन छोट्या विक्रेत्यांसाठी उत्पन्नाचे साधन ठरत आहे. ज्या ठिकाणी भारतीय संघ खेळतो त्या भागात तिरंगा, गांधी टोपी आणि पगडीची विक्री माेठ्या प्रमाणात होताना दिसते. विशेष म्हणजे येथील विक्रेत्यांमध्येही श्वेतवर्णीयांची संख्याच जास्त असते.