Icc world cup / इंग्लंडचा २७ वर्षांनी विजय : भारताला ३१ धावांनी हरवले; बेयरस्टोचे (१११) शतक

२७ वर्षांपूर्वी १९९२ विश्वचषकात इंग्लंडने टीम इंडियाला ९ धावांनी हरवले होते 

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 01,2019 08:09:00 AM IST

बर्मिंगहॅम - यजमान इंग्लंडने विश्वचषकात अखेर विजयी ट्रॅकवर पुनरागमन केले. रविवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने टीम इंडियाला ३१ धावांनी पराभूत केले. हा त्यांचा दोन पराभवांनंतर पहिला विजय ठरला. दुसरीकडे भारताचा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या.


इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३३७ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३०६ धावा करू शकला. इंग्लंडने भारताला विश्वचषकात २७ वर्षांनी पराभूत केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषकात इंग्लंड ९ धावांनी जिंकला होता. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने तिसऱ्या षटकांत राहुलची (०) विकेट गमावली. त्यानंतर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. रोहित आणि कोहलीने १७ व्या वेळी शतकी भागीदारी रचली. कोहली ६६ धावा करून परतला. त्याने सलग पाचव्यांदा अर्धशतक झळकावले.

जखमी भुवीनंतर आलेल्या शमीने ९ दिवसांत ३ लढतींत १३ बळी घेतले

शमीचे २०१५ व २०१९ या विश्वचषकात मिळून ३० बळी झाले आहेत. तो सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी पोहोचला. शमीने कपिलदेवला (२८) मागे टाकले. जहीर आणि श्रीनाथ प्रत्येकी ४४-४४ बळींसह अव्वलस्थानी आहेत. शमीला सुरुवातीच्या ३ सामन्यांत संधी मिळाली नाही. भुवनेश्वर जखमी झाल्याने त्याला स्थान मिळाले. त्याने ३ सामन्यांत सर्वाधिक १३ बळी घेतले. बुमराह व चहलने १०-१० बळी घेतले.

पहिल्यांदा

रोहितची इंग्लंडमध्ये ५ शतके, पहिला विदेशी
रोहितने १०२ धावांची खेळी केली. ताे इंग्लंडमध्ये ५ शतके काढणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला. धवन, विंडीजचे व्हिव्हियन रिचर्ड‌्स व न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने ४-४ शतके लगावली. रोहित एका विश्वचषकात ३ शतके काढणारा चौथा फलंदाज बनला. ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ (१९९६), सौरव गांगुली (२००३) व मॅथ्यू हेडन (२००७) यांनी कामगिरी केली.

भारताविरुद्ध पहिले शतक झळकावले

विश्वचषकात इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक ६ शतके झाली. ऑस्ट्रेलियाकडून ४ शतके झाली. इंग्लंडने ५ वेळा ३००+ धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो दुसरा देश ठरला. २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाने कामगिरी केली होती. बेयरस्टो व रॉयने पहिल्या गड्यासाठी १६० धावा जोडल्या. भारताविरुद्ध विश्वचषकात कोणत्याही संघाची ही सर्वात मोठी सलामी भागीदारी ठरली.

डेटा पॉइंट

> रॉय-बेयरस्टोने वनडेमध्ये इंग्लंडकडून भारताविरुद्ध सर्वात मोठी सलामी भागीदारी (१६० धावा) रचली. अॅलिस्टर कुक-इयान बेल (१५८ धावा) यांचा विक्रम मोडला.

> १० ते २० षटकांदरम्यान इंग्लंडने ९८ धावा काढल्या. त्यानंतर भारताने पुनरागमन केले आणि पुढील २० षटकांत केवळ १०० धावा दिल्या. ३ विकेट घेतल्या. अखेरच्या १० षटकांत इंग्लंडने ९२ धावा ठोकल्या.

>इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने शानदार फलंदाजी करत १११ धावा ठोकल्या. बेन स्टोक्स व जेसन रायने अर्धशतक झळकावले. स्टोक्सने ७९ आणि रॉयने ६६ धावा काढल्या. बेयरस्टो सामनावीर ठरला.

X
COMMENT